पुणे : काेराेनाबाधित रुग्णांना डायबिटीस, रक्तदाब, लठ्ठपणा अशा अनेक सहव्याधी (काेमाॅर्बिडीटीज) असतील तर त्यांना तीन दिवस ‘रेमडेसिविर’ द्यावे. तर ज्या रुग्णांना ‘सिव्हिअर अक्युट रेस्पिरेटरी इन्फेक्शन’ (सारी) आजार असेल त्यांना पाच दिवस ‘रेमडेसिविर’ हे औषध देण्यात यावे. तसेच सहव्याधी नसलेल्या रुग्णांना ॲण्टिव्हायरल न देता लक्षणांनुसार उपचार करावेत, असे उपचारांबाबतचे नवीन प्राेटाेकाॅल काेविड टास्क फाेर्सने तयार केले आहेत.
कोविड टास्क फोर्सची बैठक या आठवड्यात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. टास्क फाेर्सचे अध्यक्ष डाॅ. रमण गंगाखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सदस्य डाॅ. माधुरी कानिटकर, डॉ. दिलीप म्हैसेकर, डॉ. राजेश कार्यकर्ते, डॉ. वर्षा पोतदार, डॉ. डी. बी. कदम आणि विशेष आमंत्रित सदस्य डॉ. संजय पुजारी उपस्थित हाेते.
काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत रेमडेसिविर इंजेक्शन प्रभावी आढळले हाेते. त्यामुळे त्याचा तुटवडा निर्माण झाला हाेता आणि काळाबाजारही झाला. तसेच हे इंजेक्शन उपयुक्त नसल्याचेही जागतिक आराेग्य संघटनेने सांगितले हाेते आणि उपचारातून ते काढण्यात आले हाेते. मात्र, आता त्याचा काेराेना रुग्णांच्या उपचारात पुन्हा समावेश केला गेला आहे.
कोविड जेएन.१ व्हेरियंटची लक्षणे इन्फ्लुएंझा लाइक इलनेस (आयएलआय) किंवा ‘सारी’ या प्रकारात येऊ शकतात. आयएलआय रुग्णांमध्ये ताप, सर्दी, खोकला इ. फ्लूसारखी लक्षणे असू शकतात. सारी रुग्णांमध्ये आयएलआय लक्षणासोबत खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे/ दम लागणे इ. लक्षणे असू शकतात, असे यावेळी सांगण्यात आले.
रेमडेसिविरची काेविड रुग्णांमध्ये उपयुक्तता दिसून आली आहे. तसेच ते उपचारातून काढले नव्हते. त्यामुळे प्राेटाेकाॅलनुसार त्याचा काेराेनाच्या रुग्णांमध्ये उपयाेग करण्यात येणार आहे.
- डाॅ. दिलीप कदम, सदस्य, काेविड टास्क फाेर्स