नारायणगाव : रेमडेसिविर इंजेक्शन हे जीवनरक्षक अमृत नाही. जागतिक आरोग्य संघटनेने या इंजेक्शनचा उपचारांमध्ये फायदा होत नसल्याने यादीतून वगळले आहे. तर कोरोनावरील उपचारात प्लाझ्मा थेरपीचा उपयोग नसल्याने राज्य सरकारने ट्रायल्स बंद केल्या आहेत. त्यामुळे ज्याला खरंच गरज आहे, अशाच रुग्णांसाठी रेमडेसिविरचा वापर करावा, असे आवाहन मुंबईतील केईएम हॉस्पिटलच्या आयसीयू विभागाचे प्रमुख आणि नेस्को कोविड सेंटरचे डीन डॉ. संतोष सलागरे यांनी केले.
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पुढाकाराने शिरूर लोकसभा मतदारसंघातील खासगी व शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांसाठी वेबिनारचे आयोजन केले होते. त्यामध्ये
कोरोना प्रतिबंधक उपचार विषयावर केईएम हॉस्पिटल मुंबईचे कोविड आयसीयूचे इनचार्ज व नेस्को कोविड सेंटरचे डीन डॉ. संतोष सलागरे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील आरोग्य अधिकारी, डॉक्टर व पत्रकारांशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला.
पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत कोविड-१९ ची लक्षणे कोणती, रुग्णांवर उपचार कसे करावेत, कोविड टास्क फोर्सच्या मार्गदर्शक नियमावली कोणकोणत्या आहेत. आरटीपीसीर आणि रॅट टेस्ट नसली तरी सीटीस्कॅन व एक्सरेवरून पेशंट कसा ओळखावा, कोणत्या रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन वापरावे, प्लाझ्मा थेरपीचा खरच उपयोग होतो का, मागणी वाढल्यामुळे किती प्रमाणात व कोणाला ऑक्सिजन व व्हेंटिलेटर वापरावा, रुग्णांच्या नातेवाईकांशी समुपदेशन व सुसंवाद कसा ठेवावा, समाजात रेमडेसिविर आणि अन्य इंजेक्शनबद्दलचे गैरसमज कसे दूर करावेत, अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच विविध प्रश्नांची उत्तरेही दिली.
या दरम्यान ग्रामीण भागात रेमडेसिविर,ऑक्सिजन, व्हेटिंलेटर बेडची अनुपलब्धता व अन्य समस्यांवर चर्चा झाली. या वेळी लोकप्रतिनिधी म्हणून उपस्थित प्रश्नांची उत्तरे देताना खासदार डॉ. कोल्हे यांनी पुणे जिल्हा व लगतच्या जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, ऑक्सिजन सिलिंडर भरणा केंद्रांची उभारणी होत असल्यामुळे आगामी काळात ऑक्सिजनचा मागणीनुसार पुरवठा सुरळीत होईल. तोपर्यंत ऑक्सिजन जपून वापरावा, रेमडेसिविर इंजेक्शन देखील ज्याला खरंच गरज आहे त्यांना वापरावे सरसकट वापरू नये अशा सूचनांसह समस्यांवरील उपाय सुचविले.
या ऑनलाइन मिटिंगला डॉ. किरण राहीगुडे, डॉ. उत्तम घोरपडे, डॉ. शिवाजी थिटे, डॉ. शुभम रोडे, डॉ. सचिन भालेकर, डॉ. भगवान काकणे, डॉ. रुबिना शेख, डॉ. प्रियांका वांढेकर, डॉ. इंदिरा डॅनियल यांच्यासह जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर व हवेली तालुक्याचे आरोग्य अधिकारी, विविध शासकीय व खासगी रुग्णालयांचे डॉक्टर, पत्रकारांसह स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आदींनी सहभाग घेतला.