लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या खूपच कमी झाली आहे. रुग्ण संख्या कमी झाल्याने रेमडेसिविर इंजेक्शन्सची मागणी देखील खूपच कमी झाली असून, सध्या मोठ्याप्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शन्सचा साठा शिल्लक आहे. यामुळेच आता शनिवार (दि.१९) पासून रेमडेसिविर इंजेक्शन्स पुन्हा पूर्वी सारखे खुल्या बाजारात उपलब्ध होणार आहे. यापुढे रेमडेसिविर इंजेक्शन्सवर जिल्हाधिकारी यांचे नियंत्रण राहणार नसल्याचे स्वतंत्र आदेश काढले आहेत.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली. त्यानंतर रेमडेसिविर इंजेक्शन्स मागणी खूप मोठ्याप्रमाणात वाढली आणि इंजेक्शन्सचा काळाबाजार सुरू झाला. यामुळेच शासनाने ११ एप्रिल २०२१ पासून खुल्या बाजारातील रेमडेसिविर इंजेक्शन्साचा पुरवठा व विक्री पूर्णपणे थांबून जिल्हाधिकारी यांचे नियंत्रणाखाली वाटप सुरू केले. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला होता. सदर नियंत्रण कक्षामार्फत रेमडेसिविर औषधाचे समन्यायिक तत्वाने वाटप जिल्हयातील रुग्णालयांना करणेत येत होते. तथापि आता जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी झाल्याने व आता रेमडेसिविर औषधाचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून सदर औषधाची मागणी देखील कमी झाली आहे. त्यामुळे आयुक्त अन्न व औषध प्रशासनाने आता पुन्हा एकदा रेमडेसिविर हे इंजेक्शन आता १९/६/२०२१ पासून खुल्या बाजारात उपलब्ध करण्यात येत आहे. ज्या रुग्णालयांना या औषधाची गरज भासेल त्यांनी स्टॉकिस्टशी संपर्क करावा. यापुढे रेमडेसिविर इंजेक्शन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वितरित केले जाणार नाही याची नोंद घ्यावी. तथापि औषधाची मागणी व पुरवठा व कोविड १९ ची जिल्हयातील परिस्थिती विचारात घेऊन पुनश्च सदर औषध नियंत्रणात घेण्याबाबत योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल.