तपासणी पथक
नेमण्याच्या प्रशासनाला सुचना
तपासणी पथक नेमण्याच्या प्रशासनाला सूचना
बारामती :गरजेनुसार ऑक्सिजनचा वापर करण्यात यावा. खासगी रुग्णालयामध्ये गरजेनुसार रेमडेसिविर अथवा ऑक्सिजनचा वापर होत नसेल तर अशा रुग्णालयांवर तपासणी पथक नेमून कारवाई करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या. त्यामुळे गरज नसताना रेमडेसिविर, ऑक्सिजनसाठी रुग्ण व नातेवाईकांची कोंडी करणा-या खासगी रुग्णालयांवर आता तपासणी पथकाची करडी नजर राहणार आहे.
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोरोना विषाणू संसर्ग निर्मूलन आढावा बैठक शुक्रवारी (दि.१६) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री बोलत होते. पवार पुढे म्हणाले, या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवावेच लागेल. शासकीय यंत्रणांचे प्रयत्न आणि बारामतीतील नागरिकांच्या सहकार्याने कोरोनाच्या संकटावर लवकरच नियंत्रण मिळवू. सद्यस्थितीत बारामती शहर व ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. ही बाब चिंतेची असून कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याचा विषय सर्वांनी गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. सर्व विभागांनी समन्वय साधून काम करणे गरजेचे आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने कठोर निर्बंध लावले आहेत, नागरिकांकडून त्या निर्बंधांचे पालन केले जाईल, यासाठी दक्ष राहून काम करा. सार्वजनिक ठिकाणी तसेच अन्यत्र गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल याची सर्वांनीच दक्षता घेणे आवश्यक आहे. लसीकरणाचा वेग वाढवावा. वैद्यकीय सामग्री आणि औषधांची तसेच निधीचीही कमतरता पडू दिली जाणार नाही. सॅनिटायझरचा तसेच मास्कचा वापर करावा, सामाजिक अंतर राखावे व प्रशासनास सहकार्य करावे, ऑक्सिजन वापराबाबतही सर्व रुग्णालयांनी काळजीपूर्वक वापर करावा, असेही ते यावेळी म्हणाले. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी बारामती येथील पदाधिकारी, वैद्यकीय व प्रशासकीय अधिका-यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, ज्या भागामध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव जास्त आहे त्या ठिकाणी कडक निर्बंध करावेत. आरोग्य विभागामध्ये भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली असून मनुष्यबळाची कमतरता भासणार नाही. ऑक्सिजन पुरवठा करण्यात येईल. यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी बारामती शहरासह तालुक्यातील कोरोनाची सद्यस्थिती व कोरोना आटोक्यात आणण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबतची माहिती दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देखमुख, तहसीलदार विजय पाटील, मुख्याधिकारी किरणराज यादव, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओव्हाळ, वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, रुई रुग्णालयाचे डॉ. सुनील दराडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गट नेता सचिन सातव आदी उपस्थित होते.
----------------------------------------
संचारबंदी केवळ नावालाच...
बारामती शहरात संचारबंदी केवळ नावाला असल्याचे चित्र आहे. प्रत्येक ठिकाणी नागरिकांची ये-जा सुरू आहे. चौका-चौकात बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. मात्र पोलिस कर्मचारी जाणारा-येणा-याकडे विचारपूस करत नसल्याने नागरिक देखील न घाबरता शहरभर फिरत आहेत. एकीकडे संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन आवाहन करीत आहे. मात्र सन्मवय राखून संचारबंदीची कडक अंमलबाजवणी करण्याची गरज आहे. अत्यावश्यक कामाशिवाय रस्त्यावर, चौकात फिरणा-या व गर्दी करणा-यांवर कारवाई होणे गजेचे आहे.
-----------------------------------------
रेमडेसिविरचा तुटवडा कायम...
रुग्णांच्या नातेवाईकांची रेमडेसिविर आणि आॅक्सिजन बेडसाठी धावपळ कायम आहे. बारामतीमध्ये रेमडेसिविर मिळत नसल्याने सांगली, पंढरपूर, अलकुज, नगर आदी ठिकाणाहून रेमडेसिविर आणण्यासाठी नातेवाईकांची पळापळ सुरू आहे. मात्र याठिकाणी देखील मिळाले तर एखाद दुसरे इंजेक्शन मिळते. त्यासाठी काळ्या बाजारात ८ ते १५ हजारापर्यंत पैसे मोजावे लागतात, असे एका नातेवाईकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोरोना विषाणू संसर्ग निर्मूलन आढावा बैठकीत अधिका-यांशी संवाद साधताना आणि मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार.
१६०४२०२१-बारामती-०९
संचारबंदीची घोषणा होऊन देखील बारामती शहरातील भिगवण चौकात अशी वर्दळ सतत असते.
१६०४२०२१-बारामती-१२