अवसरी : पोटचाऱ्यांसाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जात नाहीत, त्यांच्या ७/१२ वर संपादनासाठी मारलेले शिक्के काढण्यात येणार असून, संपादित जमिनीचा मोबदला मिळणार आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शिक्के काढावेत, अशी अनेक दिवसांपासूनची त्यांची मागणी होती. डिंभे उजवा कालव्यातून अवसरी बुद्रुक गावातील शेतकऱ्यांना पिकासाठी पाणी मिळावे म्हणून पाटबंधारे विभागाने ७ वर्र्षांपूर्वी हिंगेवस्ती, चव्हाणमळा, वरचा हिंगेमळा, खालचा शिवार या भागातील जमिनी ताब्यात घेऊन शेतकऱ्यांच्या जमिनीवरील ७/१२ उताऱ्यावर पोटचारीसाठी संपादित म्हणून शिक्का मारले होते. यात काही शेतकऱ्यांच्या जमिनीवर पोटचारी गेली नसतानाही हे शिक्के मारले होते. त्यामुळे गावातील जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद होते. दोन दिवसांपासून पाटबंधारे विभागाने अवसरी गावातील पोटचाऱ्यांची मोजणी चालू केली आहे. ज्या शेतकऱ्यांची जमीन पोटचारीत गेली आहे, अशा शेतकऱ्यांना अंदाजे एका गुंठ्याला २२ ते २३ हजार रुपये देण्यात येणार आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून पोटचारी गेली नाही, अशा शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावरील शिक्केकाढून टाकणार आहेत. मोजणीचे काम महसूल विभागाचे मंडल अधिकारी डी. एस. कोरपड, तलाठी एस. एस. गायकवाड, डिंभे प्रकल्पाचे संपादन मंडल प्रतिनिधी ई. एस. गावडे, सहायक स्थापत्य अभियंता बी. आर. सोनजे, कोतवाल संतोष शिंगाडे हे पोटचारी मोजणीचे काम करीत आहेत. (वार्ताहर)
अवसरीच्या शेतकऱ्यांना दिलासा!
By admin | Published: March 02, 2016 1:13 AM