पुणे : लष्कर भागातील कॅपिटल म्हणजेच आताच्या व्हिक्टरी सिनेमागृहात अनेक इंग्रज प्रेक्षक जमलेले... सिनेमागृहात चित्रपट पाहण्यात सारेच तल्लीन होते... अचानक धडामधूम असा आवाज झाला आणि बॉम्बस्फोटाने सर्व परिसर हादरून गेला. ब्रिटिश सरकारसह इंग्लंडचे पार्लमेंटदेखील या घटनेने खडबडून जागे झाले होते. पुण्यातील क्रांतिकारकांनी ब्रिटिशांविरुद्ध केलेल्या या धमाक्याची आठवण रंगावलीतून जागृत करत क्रांतिकारकांच्या वारसदारांचा सन्मान या घटनेच्या ७५व्या स्मरणदिनानिमित्त केला. इतिहासप्रेमी मंडळ व हिंद तरुण मंडळ ट्रस्टतर्फे कॅम्पमधील व्हिक्टरी चित्रपटगृहाच्या परिसरात हा कार्यक्रम घेण्यात आला. राष्ट्रीय कला अकादमीच्या ६० कलाकारांनी ३० बाय ४० फूट आकारातील रंगावली काढली. कँटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव, अतुल गायकवाड, रा. स्व. संघाचे अॅड. प्रशांत यादव, नगरसेवक दिलीप गिरमकर, इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे, हिंद तरुण मंडळाचे अध्यक्ष नीलेश यादव, व्हिक्टरी थिएटरचे मालक चिनॉय आदी उपस्थित होते. क्रांतिकारकांच्या वारसदारांचा सन्मान केला. विद्यार्थ्यांनी घोषपथकातून मानवंदना दिली. डॉ. सुधीर डोंगरे यांनी क्रांतिकारक बापू डोंगरे यांच्या आठवणी जागवल्या. हरिभाऊ लिमये, निळूभाऊ लिमये, बापू साळवी, भालचंद्र वायाळ, बाबूराव चव्हाण, दत्ता जोशी उपस्थित होते. रंगावली प्रदर्शन २५, २६ जानेवारी रोजी दिवसभर खुले राहणार आहे.
क्रांतिकारकांनी देशभरातील इंग्रजांच्या जुलमी सत्तेला हादरवून टाकणारा बॉम्बस्फोट २४ जानेवारी १९४३ ला येथे घडवून आणला. त्यामध्ये ४ इंग्रज ठार झाले, तर १८ जण जखमी झाले. त्यामुळे खवळलेल्या इंग्रजांनी धरपकड सुरु केली. त्यानंतर विविध कारणांनी भास्कर कर्णिक, दत्ता जोशी हे कारागृहातच मरण पावले. त्यामुळे या स्फोटाचा खटला देशभर गाजला. त्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण होत असून, त्याचे स्मरण करण्याकरिता या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पुणेकरांच्या दृष्टीने हे केवळ चित्रपटगृह नसून राष्ट्रीय स्मारक आहे. - मोहन शेटे