पुणे : मराठी भाषेचा सखोल अभ्यास करून जेम्स मोल्सवर्थ यांनी मराठी-इंग्रजी शब्दकोश संपादित केला. मोल्सवर्थ डिक्शनरी १८५७ साली प्रकाशित झाली. १३ जुलैै हा मोल्सवर्थ यांचा १५० वा स्मृतिदिन... याच दिवसाचे औचित्य साधून विश्वकर्मा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्राध्यापक डॉ. किरण ठाकूर यांनी विशेष पुस्तिका प्रकाशित केली आहे. पुस्तिका मराठी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
डॉ. किरण ठाकूर म्हणाले, ‘मोल्सवर्थ डिक्शनरीची दुसरी सुधारित आवृत्ती शरद गोगटे यांनी १९७५ साली प्रसिध्द केली. डिक्शनरी अत्यंत उपयुक्त आणि संग्रही ठेवण्याजोगी आहे. मोल्सवर्थ या व्यक्तीने केलेले एवढे मोठे काम नेमके किती लोकांना माहीत आहे, याचा मी शोध घेत होतो. अनेकांना शब्दसंग्रहाबद्दल माहीत नव्हते. जनसामान्यांपर्यंत त्याचे कर्तृत्व पोहोचवता यावे, यादृष्टीने पुस्तिकेची संकल्पना पुढे आली आणि १५० व्या पुण्यतिथीनिमित्त आकाराला आली.’
पुस्तिकेमध्ये जेम्स थॉमस मोल्सवर्थ यांचा सखोल परिचय, इत्थंभूत माहिती कथन करण्यात आला आहे. शरद गोगटे यांनी वर्णन केलेला मोल्सवर्थ यांचा प्रवास, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी सुधारित आवृत्तीमध्ये लिहिलेली प्रस्तावना, एन. जी. कालेलकर यांनी लिहिलेली प्रस्तावना, मोल्सवर्थ यांचे सहकारी, मराठी-इंग्रजी शब्दकोशाची माहिती, सोलापुरात झालेली सुरुवात अशा विविध रंजक कहाणी आणि माहितीचा समावेश आहे. शब्दकोश इंटरनेट आणि युनिकोडचा वापर करुन देवनागरी लिपीमध्ये पुन्हा उपलब्ध झाला आहे.