सोमेश्वरनगर : येथील पोस्ट आॅफिसमधील पोस्टमास्तरच्या उद्धट वागणुकीला सोमेश्वरनगरातील ग्राहक वैतागले असून, आतापर्यंत उर्मट उत्तरे देणे, दमदाटी करणे असे प्रकार सुरू होते. एका नागरिकाला धक्काबुक्की करण्याचा प्रकार या पोस्टमास्तरने केल्याचे उघड झाले आहे.
सोमेश्वरनगर या ठिकाणी सोमेश्वर कारखान्यावर पोस्ट आॅफिस आहे. आसपासच्या वाणेवाडी, मुरूम, वाघळवाडी, सोमेश्वरनगर, करंजेपूल, निंबूत, खंडोबाचीवाडी, गडदरवाडी, करंजे, शेंडकरवाडी, सोरटेवाडी, मागरवाडी, देऊळवाडी या गावांसह अनेक वाड्यावस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांना मुख्य पोस्ट आॅफिस म्हणून या आॅफिसमध्येच यावे लागते. सध्या इंटरनेटच्या युगात विचारांची देवाणघेवाण जवळ आली असली, तरी शासनाच्या विविध योजना, रजिस्टर एडी, कुरियर, मासिक ठेव योजना, महिलांच्या योजना, आरडी योजना आदी कामांसाठी नागरिकांना पोस्ट आॅफिसमध्ये यावे लागते. मात्र, या ठिकाणच्या पोस्टमास्तरांच्या स्वभावाचा प्रत्यय रोज चार ते पाच नागरिकांना येत आहे.
पोस्ट आॅफिस उघडण्याची वेळ सकाळी आठची आहे; मात्र हे महाशय नेहमीच उशिरा येत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. त्यामुळे अनेक खातेदारांना त्यांची वाट पाहत बसावे लागते. कामावर आल्या-आल्या इंटरनेट बंद असल्याचे कारण सांगून हे महाशय ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना तासन् तास बसवून ठेवतात. प्रत्येक नागरिकावर ते चिडूनच बोलतात. नागरिकांना दमदाटी करणे, उलट उत्तरे देणे, कागदपत्रे अंगावर फेकून देणे, इंटरनेट बंद आल्याचे सांगणे, लोकांच्या अंगावर धावून जाणे, असे त्यांचे प्रकार रोजचेच सुरू आहेत.सोमेश्वरनगर पोस्ट आॅफिसमध्ये मी आरडीचे पैसे भरण्यासाठी गेलो होतो, त्या वेळी इंटरनेट बंद असल्यामुळे मास्तरांना, मी कामावर पंचिंग करून आलो. माझी स्लीप आणि पैसे येथे ठेवा, असे सांगितले. यावर त्यांनी रागाच्या भरात, माझी स्लीप फाडून अंगावर फेकली. मला धक्काबुक्की करीत हेल्मेटने मारण्याचा प्रयत्न केला.- अजित जगताप, खातेदारत्या दिवशी कामाचा ताण होता. त्यातच जगताप यांनी अपशब्द वापरले. मात्र, मी त्यांना कोणत्याही प्रकारची धक्काबुक्की केली नाही.- संतोष रायकर, पोस्टमास्तर