लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्यासाठी महापालिका प्रशासनाने शहरात २५ प्रकल्प सुरू केले. यांपैकी केवळ १९ प्रकल्पच सुरू आहेत. यात वीजनिर्मिती करण्याऐवजी शहरातील कचराकोंडी फोडण्यासाठी शक्य तेवढा कचरा जिरविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समोर आले आहे.कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्यासाठी महापालिका प्रशासनाने शहरातील विविध भागांत २५ प्रकल्प उभारले आहेत. यासाठी सुमारे १६ कोटी रुपये खर्च करण्यात आला असून, देखभाल-दुरुस्तीसाठीही दर वर्षी दीड कोटी रुपयांचा खर्च केला जातो. तरीही, यातील ६ प्रकल्प सध्या बंद पडले असून, अन्य प्रकल्प ७० ते ८० टक्के क्षमतेनेच सुरू आहेत. या प्रकल्पाचे नूतनीकरण केल्यास अपेक्षित उद्दिष्ट पूर्ण होऊ शकते; परंतु कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्यापेक्षा शहरातील जास्तीत जास्त ओला कचरा या प्रकल्पांमध्ये जिरविण्याचा प्रयत्न सुरू आहेत. यामुळे ज्या उद्देशाने प्रकल्प सुरू केले, त्यालाच हरताळ फासला जात आहे.ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणे, या प्रमुख उद्देशाने हे २५ प्रकल्प सुरू करण्यात आले. या प्रत्येक प्रकल्पाची सरासरी ५ टन कचऱ्याची क्षमता आहे. महापालिकेच्या हद्दीत निर्माण होणारा कचरा जिरविणे आणि त्यापासून महापालिकेलादेखील फायदा होण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून हे प्रकल्प उभारण्यात आले. महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कात्रज, घोले रोड, म्हाडा कॉलनी येरवडा, रेल्वे म्युझियम कात्रज येथील पाच प्रकल्प पूर्णपणे बंद आहेत. शहरातील या वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये १२५ टन कचरा जिरविण्याची क्षमत असताना सध्या ७० ते ८० टनच कचरा जिरवला जात आहे. सध्या सुरू असलेल्या १९ प्रकल्पांमध्ये ३० क्युबिक मीटर गॅसनिर्मिती होत असून, केवळ ३ ते ४ किलोवॉट वीजनिर्मिती होत आहे. या प्रकल्पांमधून निर्माण होणारी वीज महापालिकेच्या पथदिव्यासाठी वापरली जाते. यासाठी वीजनिर्मितीचे प्रकल्प रात्री सुरू ठेवावे लागतात. यासाठी जनरेटरचा रात्री खूप आवाज होत असल्याने नागरिकांकडून प्रकल्पांना विरोध होत असल्याने वीजनिर्मितीमध्ये अडथळा येत असल्याचे अधिकृत सूत्रांंनी सांगितले.
वीजनिर्मिती दूरच; पण कचरा जिरविण्याचा उद्देश
By admin | Published: May 06, 2017 2:45 AM