पुणे : शहरातील बहुचर्चित कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामासाठी टिळेकर नगर ते खडी मशीन या दरम्यानची दीड एकर जागा ताब्यात आली आहे. या भागात रस्त्याचे काम सुरू असून, त्यातील एक अडथळा दूर झाला आहे.
कात्रज- कोंढवा रस्त्याचे भूसंपादन होत नसल्यामुळे हा प्रकल्प रखडला आहे. अगोदर ८४ मीटरचा रस्ता नियाेजित होता. मात्र भूसंपादनासाठी लागणारा खर्च वाढत असल्याने सुरुवातीला ५० मीटर रस्ता विकसित करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. रस्त्याच्या भूसंपादनासाठी २८० कोटींचा निधी लागणार आहे.
राज्य सरकारने २०० कोटींचा निधी उपलब्ध करून देणार आहे. उर्वरित ८० कोटी रुपये पालिकेच्या अंदाजपत्रकामधून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. रस्ता विकसनासाठी खर्ची निविदा रक्कम वगळून उर्वरित निविदेसाठी ९० कोटी, असे एकूण १७० कोटी आवश्यक आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने सातव्या वेतन आयोगाचा फरक देण्यासाठी असलेल्या तरतुदीमधून ३० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भूसंपादनासाठीच्या हालचाली मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या.
कात्रज-कोंढवा रस्त्यावरील टिळेकर नगर ते खडी मशीन हा सर्वांत महत्त्वाचा टप्पा आहे. त्यासाठी जागा मालक प्रकाश धारिवाल यांच्याशी चर्चा करण्यात आली. महापालिकेचे उपायुक्त महेश पाटील, उपअभियंता बागवान, अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे, कार्यकारी अभियंता चव्हाण, उपअभियंता गायकवाड यांनी तडजोडीने प्रकाश धारिवाल यांच्याकडून ताबा घेतला. त्यामुळे सुमारे दीड एकर जागा ताब्यात घेण्यात आली आहे. यासाठी प्रकाश धारिवाल यांनी सहकार्य केले, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सांगितले.