दुर्दैवाने या वरुण वृक्षांचा नवसह्याद्री सोसायटीतला तिसरा भाउबंद मात्र २ वर्षांपूर्वीच नागरिकांच्या दुर्लक्षामुळे बळी पडला. तिथल्या रस्त्यावरचा झाडलेला पालापाचोळा या सुंदर वरुण वृक्षाच्या तळाशी रचला जात असे आणि पेटवला जात असे. शोकांतिका अशी की वरुण म्हणजे पावसाचा देव, तोच या निष्काळजीपणे लावलेल्या आगीत जळून नष्ट झाला.
दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला वादळी वा-यात अनेक झाडे उन्मळून पडतात, जीवितहानी होते, वाहनांचे नुकसान होते. अशा अपघाता नंतर ''''कशी परदेशीच झाडे पडतात'''' याची चर्चा करण्याऐवजी झाडाला आधार देणे, कुजलेल्या धोकादायक फांद्या वेळीच उतरवणे महत्वाचे आहे. खोड आतून किडले आहे का याची तपासणी केली तर अपघात टाळता येतात. हे वृक्षांपासून होणारे धोके झाले.
वृक्षांना होणारे धोके
खोडाच्या तळाशी डांबर, काॅक्रीट किंवा ठोकळे गच्च बसवल्यामुळे मुळांना हवा, पाणी अन्न न मिळाल्याने झाड कमकुवत होते. झाडाचा अन्नपुरवठा सालीतून होतो त्यामुळे साल कापल्यास किंवा खोडावर तार दोरी बांधल्यास झाडाची वाढ खुंटते. झाड लावताना बसवलेले लोखंडी पिंजरे नंतर काढत नाहीत, ते खोडांमध्ये शिरून झाड विद्रूप, कमकुवत होते.
नागरिकांनी करावे वृक्षांचे संगोपन
केवळ उद्यान विभागाला दोष देण्यापेक्षा नागरिकांनी झाडे योग्य जोपासली, तर पुणे शहर जैवविविधते खेरीज वृक्षप्रेमासाठी कौतुकाने ओळखले जाईल. रस्त्यावरच्या दुर्मिळ झाडांना काही धोका निर्माण होत असेल तर तो दूर करून झाडे वाचवणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे. सुजाण नागरिकांनी आपापल्या भागातल्या झाडांवर लक्ष ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा. काही शहरांमध्ये अश्या काळजीवाहकाचे नाव आणि फोन नंबर दिलेले फलक लावतात. पुण्यातील वृक्षप्रेमी संस्थांनी ही संकल्पना लोकप्रिय करावी, असे इंगळहळीकर यांनी सांगितले.