पुणे : शहरात मकरसंक्रांतीनिमित्त पतंग उडविले जातात. पतंगांसाठी वापरण्यात येत असलेल्या चायनीज मांजास बंदी असली तरी तो सर्रासपणे विक्री होत असल्याचे चित्र शहरात व उपनगरात पाहायला मिळत आहे. कायद्याने बंदी असलेल्या चायनीज मांजाचा वापर केला जात असल्याने दरवर्षी या मांजामुळे नागरिक, पक्षी जखमी होण्याच्या व मृत्यू हाेण्याच्या घटना घडतात. त्यासाठी मांजाचा वापर करू नये, असे अवाहन पर्यावरणप्रेमी करत आहेत.
पुण्यात मांजामुळे गळा कापून नुकताच दाैंड येथे एका ४६ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. अशाप्रकारे नागरिकांचे याआधीदेखील मृत्यू झाल्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. म्हणून मांजाचा फास गळ्याभाेवती आवळला जात आहे. दरवर्षी जानेवारीत पतंग उडविण्यास सुरुवात होते. चायनीज मांजा विक्रीवर बंदी असूनही सर्रास वापर सुरूच असल्याचे शहरात घडलेल्या घटनांवरून दिसून येत आहे.
एरवी नागरिक जखमी झाल्यानंतर पोलिसांकडून मांजा विकणाऱ्यांचा शोध हाती घेतला जातो. मात्र, मांजाविक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई हाेणे गरजचे आहे. महापालिकेनेही अशा दुकानदारांचे परवाने रद्द करणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून होत आहे.
पालकांनी करावा विचार
शासनाने चायनीज मांजावर बंदी घातलेली असताना बाजारात चायना मांजाची विक्री होत आहे. या चायनीज मांजामुळे स्वत:च्या आणि इतरांच्या जीवावर संक्रांत येऊ शकते. त्यामुळे पतंग उडवताना खबरदारी घ्या आणि दोऱ्याचा वापर करा. पालकांनी मुलांना चायनीज मांजासह इतर कोणताही घातक मांजा घेऊन देऊ नये. पालकांनी अंतर्मुख होऊन विचार करावा आणि आपल्या मुलांचा आणि इतरांचाही जीव वाचवावा, असे आवाहन पर्यावरण तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
६० टक्के पक्षी हे मांजामध्ये अडकतात
मांजामुळे झाडांवर पक्षी अडकतात व जखमी हाेतात. सन २०१६ पासून आतापर्यंत शहर अग्निशामक दलाने अशा तीन हजार ८७९ प्राणी व पक्ष्यांची सुटका केली आहे. जर ते जखमी झालेले असतील तर त्यांना कात्रज प्राणीसंग्रहालय येथे उपचारासाठी देण्यात येते. यातील ६० टक्के पक्षी हे मांजामध्ये अडकत असल्याने नागरिकांनी मांजाचा वापर करू नये. - नीलेश महाजन, फायरमन, नियंत्रण कक्ष
पर्यावरणप्रेमींचे एकत्र येऊन प्रबोधन
शहरातील टेकड्यांवर ‘मांजा हटाव, जान बचाव’ अशी मोहीम राबवून नॉयलान, चायनीज मांजाबाबत जनजागृती केली जाते. तळजाई टेकडीवर मागील वर्षी १ घुबड, ३ कावळे, २ कबुतर अन्य पक्ष्यांचे जीव वाचवले आहेत. याबाबत दरवर्षी पर्यावरणप्रेमी एकत्र येऊन प्रबोधन केले जाते. - लोकेश बापट, अध्यक्ष, टेलर्स ऑर्गनायझेशन