पुणे : शहरातील सर्व अनधिकृत फ्लेक्स २१ एप्रिलपर्यंत काढून टाकून शहर स्वच्छ करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला देण्यात आले आहेत. २१ एप्रिलनंतर शहरामध्ये एकही अनधिकृत फ्लेक्स राहणार नाही, अशी घोषणा महापौर प्रशांत जगताप यांनी गुरुवारी केली. शहराचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी महापौरांनी पुढाकार घेतला असून, शहर फ्लेक्समुक्त करण्याचा विडा त्यांनी उचलला आहे.प्रसिद्धीचा सर्वांत स्वस्त पर्याय म्हणून मुख्य चौक, रस्त्यांवर, गल्ली-बोळात, झाडांवर, खांबावर असे दिसेल तिथे अनधिकृत फ्लेक्स, होर्डिंग, फलक लावण्याचे प्रकार राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच व्यावसायिक संस्थांकडून केला जातो. यामुळे शहराचे मोठ्या प्रमाणात विद्रूपीकरण होत असल्याने याविरोधात स्वयंसेवी संस्थांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. याची गंभीर दखल घेऊन याविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर महापौरांनीही आता फ्लेक्समुक्त पुण्यासाठी पुढाकार घेतला आहे. महापौरांनी शहरातील सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना याबाबतच्या सूचना केल्या. प्रशांत जगताप यांनी सांगितले, ‘‘शहरात २१ एप्रिलनंतर एकही फ्लेक्स दिसता कामा नये, याच्या सक्त सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. शासकीय-निमशासकीय कार्यक्रमांच्या जाहिरातीचे फ्लेक्स लावायचे असतील तर त्यांनी क्षेत्रीय कार्यालयांकडून परवानगी घेऊनच फ्लेक्स लावावेत. महापालिकेचे रीतसर शुल्क भरून, परवानगी भरून जाहिराती केल्या पाहिजेत.’’फ्लेक्स न लावण्याबाबत अनेकदा विविध राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी आवाहन केले आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी जाहीररीत्या फ्लेक्स न लावण्याच्या कानपिचक्या कार्यकर्त्यांना दिल्या. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील फ्लेक्स प्रकरणावरून कार्यकर्त्यांना चांगलेच सुनावले आहे. उच्च न्यायालयाचे कडक निर्देश त्याबाबत जाहीर झाले आहेत. मात्र, तरीही अनधिकृत फ्लेक्सच्या संख्येत घट झालेली नाही. त्यामुळे महापौर फ्लेक्समुक्त पुण्याचे आव्हान पुढील १५ दिवसांत कसे पेलणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
बेकायदा फ्लेक्स काढा
By admin | Published: April 08, 2016 1:07 AM