चंदननगर : भाजपा सरकारने जनतेला लोकसभेत, विधानसभेत खोटी आश्वासने देऊन निवडणुका जिंकल्या. आता मनपा निवडणुकीतही आश्वासने देऊन विजयाचे स्वप्न भाजपा पाहत आहे. पारदर्शकतेचे खोटे गाजर जनतेला दाखविले जात आहे. भाजपाने त्यांचे कमळाचे चिन्ह गोठवून गाजराचे चिन्ह ठेवावे, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.चंदननगर, वडगावशेरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांसाठी रॅली काढून प्रचारसभा घेतली. या वेळी बापूसाहेब पठारे, अण्णासाहेब पठारे, महेंद्र पठारे, नारायण गलांडे, संजिला पठारे, सुमन पठारे, रमेश आढाव, उषा कळमकर, माजी न्यायाधीश अॅड. भैयासाहेब जाधव, प्रकाश गलांडे, आनंद सरवदे, सुरेखा खांदवे, शिल्पा गलांडे, अलका कांबळे, भीमराव गलांडे, बाबासाहेब गलांडे, विजय गलांडे, योगेश गलांडे, यशवंतराव चव्हाण, पप्पू गरुड, राहुल पठारे, बापू केरबा पठारे, सचिन पठारे आदी उपस्थित होते.मुंडे म्हणाले, ‘‘भाजपा सरकारने मांसबंदी, नोटाबंदीचे निर्णय लादले आहेत. मनपा निवडणुकीत मतदान करताना चुकलात, तर भाजपा नसबंदीचादेखील निर्णय घेईल. नोटाबंदी करून मोदींची काळा पैसावाल्यांना घरपोच पैसे डिलिव्हरी देऊन जनतेला मूर्खात काढले.’’बापू पठारे म्हणाले, ‘‘दोन-अडीच वर्षांत खासदार-आमदारांनी काय कामे केली ती दाखवावीत. वडगावशेरी मतदारासंघाचा कायापालट हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून झाला आहे. वडगावशेरीतील राजा शिवछत्रपती उद्यानाचे भूमिपूजनदेखील राष्ट्रवादीने केले होते; मात्र त्याचे श्रेय विद्यमान आमदार घेत आहेत.’’ आशिष माने यांनी सूत्रसंचालन केले.(वार्ताहर)
‘कमळ’ चिन्ह काढून गाजर ठेवावे
By admin | Published: February 18, 2017 3:35 AM