देहूगाव : गेल्या काही दिवसांपासून श्रीक्षेत्र देहूगावला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबन लोणीकर यांची पाणीपुरवठा केंद्र व जलउपसा केंद्राला भेट देऊन पाहणी केली. योजनेतील त्रुटी तातडीने दूर करून पाणीपुरवठा सरळीत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. योजना ग्रामपंचायतीला चालविणे शक्य नसल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेने ती चालवावी किंवा देहूला पाणीपुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. याबाबत संबंधितांशी चर्चा करू किंवा देहूला स्वतंत्र नगरपालिकेचा दर्जा द्यावा की काय याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करून लवकरच देहूगावचा पाणी प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन लोणीकर यांनी दिले. आमदार संजय भेगडे, पंचायत समिती सदस्य सुहास गोलांडे, देहूगावच्या सरपंच हेमा मोरे,उपसरपंच अभिजित काळोखे, संस्थानचे विश्वस्त सुनील दिगंबर मोरे, जीवन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अभियंता बी. डी. यमगर, कार्यकारी अभियंता एन.एन.भोई, उपविभागीय अभियंता गिरीष पाटील, शाखा अभियंता धनंजय जगधने, जयदीप अग्निहोत्री, प्रशांत ढोरे, बाळासाहेब काळोखे, ग्रामपंचायत सदस्य दिनेश बोडके,संतोष हगवणे, सचिन साळुंके, सचिन विधाटे, नीलेश घनवट, नरेंद्र कोळी, राणी मुसुडगे, दीपाली जंबुकर, राम मोरे, अभिमन्यू काळोखे, माऊली काळोखे, संजय जंबुकर, नारायण पचपिंड व ग्रामस्थ उपस्थित होते. देहूगाव हे तीर्थक्षेत्र असल्याने येथे सातत्याने यात्रेकरू श्री संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात. अनेकदा पाच-पाच दिवस पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या ग्रामस्थांनी मंत्री लोणीकर यांच्यापुढे विविध प्रश्न मांडले. (वार्ताहर)
पाणी योजनेतील त्रुटी दूर करा
By admin | Published: December 28, 2015 1:18 AM