पुणे महापालिकेच्या सभेत ३७० वरुन सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुगलबंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 11:58 AM2019-08-21T11:58:23+5:302019-08-21T12:00:58+5:30
काही सदस्यांनी काँग्रेसने जम्मू काश्मीर आपल्या देशापासून कसे वेगळे ठेवले हे देखील सांगितले.
पुणे : जम्मू काश्मीरमधील कलम ३७० आणि ३५ अ रद्द केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री अमित शहा यांचा अभिनंदनाचा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला. यावेळी सत्ताधा-यांनी मोदी, शहाचे कौतुक करत काँग्रेसवर टिका केली. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँगे्रसने ३७० कमल रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरचा विकास होणार असल्याचा दावा कसा खोटा असल्याचे सांगितले. यामुळे कलम ३७० वरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी, विरोधकांमध्ये चांगली जुगलबंदी रंगली.
अभिनंदनाच्या ठरावावर चर्चा करताना भाजपचे स्वीकृत नगरसेवक गोपाळ चिंतल, मंजुषा नागपूरे, माधुरी सहस्त्रबुध्दे, मंजुश्री खर्डेकर, जयंत भावे, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी मोदी आणि शहा यांचे अभिनंदन करत इतके वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न बहुमताने सत्तेवर येताच भाजपने घेतला. हे सांगताना काही सदस्यांनी काँग्रेसने जम्मू काश्मीर आपल्या देशापासून कसे वेगळे ठेवले हे देखील सांगितले. यावर काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे आणि विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, नगरसेवक प्रशांत जगताप यांनी यापूर्वी काँग्रेसने जम्मू काश्मीरच्या जनतेच्या विकासासाठी, लोकांच्या हितासाठी काय-काय केले सांगितले. तसेच केंद्र शासनाने कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरचा कसा विकास होणार याचा केलेला दावा खोटा असल्याचा सांगितला. यावर उत्तर देताना स्थायी समिती अध्यक्ष सुनिल कांबळे आणि उपमहापौर डॉ.सिध्दार्थ धेंडे यांनी काँगे्रसच्या सदस्यांनी सांगितलेली माहिती खोटी असल्याचे सांगतिले. यामुळे अभिनंदनाच्या ठरावावर चांगलीच जुगलबंदी रंगली.
--------------------------
काँग्रेस सदस्यांमधील वाद सर्वसाधारण सभेत चव्हाट्यावर
महापौर मुक्ता टिळक यांच्या अध्यक्षतेखाली झालेली मंगळावर (दि.२०) रोजीची सर्वसाधारण सभा जम्मू काश्मीरचे कलम ३७० रद्द केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री अमित शहा यांचा अभिनंदनाचा ठराव मांडून सभा तहकूब करण्याचा प्रस्ताव प्रभारी सभागृहनेते सुनिल कांबळे यांनी ठेवला. याला विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी अनुमोदन दिले. परंतु महापौर मुक्ता टिळक यांनी मंगळवारच्या सभेत प्रश्नोत्तराचा तास घेण्यात येईल, असे आश्वासन काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांना दिले होते. यामुळे सभा तहकूबीचा प्रस्तावर मांडताच बागवे यांनी हरकत घेतली. गेल्या तीन-चार महिन्यांपासून आपण प्रश्नोत्ताराचा तास घेण्याची मागणी करत आहोत. परतुं प्रत्येक वेळी सत्ताधारी जाणीपूर्वक याकडे दुर्लक्ष करत असल्याचे सांगत सभा सुरु ठेवण्याची मागणी केली. यावर तुमच्या पक्षाच्या गटनेत्यांच्या मंजूरीनंतरच सभा तहकूब करण्यात येत असल्याचे सांगितले. यावरून बागवे आणि गटनेते अरविंद शिंदे यांच्यामध्ये काही प्रमाणात बाचाबाची झाली. या दोन्ही सदस्यांमध्ये असलेले वाद यानिमित्त सर्वसाधारण सभेतच चव्हाट्यावर आला.