पुणे : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय)च्या शैक्षणिक परिषदेमधून विद्यार्थ्यांसह विभागप्रमुखांना हटविल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी सोमवारी आंदोलन केले. ‘गिव्ह बॅक अवर अकॅडमिक कौन्सिल’, ‘स्टॉप फी हाईक’ अशा स्वरूपाचे फलक हातात घेऊन विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. उद्या (दि. २४) मुंबईमध्ये शैक्षणिक परिषदेची बैठक होत आहे, त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलनाचे शस्त्र उगारले. दरम्यान, संस्थेमधील विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोपही विद्यार्थ्यांनी केला.केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने स्थापन केलेल्या जीडी खोसला कमिटीनुसार शैक्षणिक परिषदेमध्ये एफटीआयआयच्या स्टुडंट असोसिएशनचाही समावेश असायला हवा. अभ्यासक्रम, शुल्क, शिक्षण पद्धती व धोरण, प्रवेश परीक्षा, गुणवत्ता पद्धती, शिष्यवृत्ती, पायाभूत सुविधा व शाखा या संदर्भातील सर्व निर्णय शैक्षणिक परिषदेमार्फत घेतले जातात. जानेवारी २०१७ शैक्षणिक परिषदेमध्ये विद्यार्थ्यांनी शुल्क, अभ्यासक्रम, शिस्त असे अनेक मुद्दे मांडल्याने नियामक मंडळाने शैक्षणिक परिषदेमधून विद्यार्थी प्रतिनिधींना हटविले. केवळ विभागप्रमुख असे होते की ज्यांना विद्यार्थ्यांचे प्रश्न अवगत होते. एक शेवटची त्यांचीच आशा होती. मात्र नियामक मंडळाने नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये बेकायदेशीरपणे शैक्षणिक परिषदेमधून विभागप्रमुखांनाही काढून टाकले. त्याबदल्यात विद्यार्थीविरोधी सदस्यांना शैक्षणिक परिषदेमध्ये स्थान दिले जात आहे. दरवर्षी विद्यार्थ्यांना शुल्कवाढीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे समाजातील आर्थिक दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी एफटीआयआयमध्ये शिक्षण घेणे स्वप्नवत ठरण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे स्टुडंट असोसिएशनचे म्हणणे आहे. दरम्यान, एफटीआयआयची शैक्षणिक परिषद उद्या (दि. २४) मुंबईमध्ये एफटीआयआयचे अध्यक्ष बी. पी. सिंग यांच्या अध्यतेखाली होणार आहे. या बैठकीमध्ये संस्थेतील अकरा विभागप्रमुखांना सहभागी होता येणार नाही. यापुढे शैक्षणिक परिषदेमध्ये विभागाचे अधिष्ठाता सहभागी होतील. विभागप्रमुखांनी त्यांच्याशी चर्चा करून अडचणी सांगाव्यात, असा निर्णय एफटीआयआयच्या नियामक मंडळाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आजच्या बैठकीत होणार आहे. दरम्यान, या बैठकीच्या स्थळी विद्यार्थी आंदोलन करणार आहेत.............‘एफटीआयआयमधील अनेक मुद्दे थेट विद्यार्थ्यांशी संबंधित आहेत. शैक्षणिक परिषदेत विद्यार्थी व विभागप्रमुखांना सहभागी होण्याचा अधिकार परत मिळायला हवा, तरच अनेक विषयांवर चर्चा घडू शकते आणि विद्यार्थ्यांना नक्की काय हवंय हे पोहोचविता येऊ शकते.- अधीत, अध्यक्ष, स्टुडंट असोसिएशन.......चित्रपट विभागाचे सात प्रमुख आणि दूरचित्रवाणी विभागाचे चार प्रमुख या बैठकीला उपस्थित राहू शकणार नाहीत. दोन्ही विभागांचे अधिष्ठाता तसेच दोन विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित असतील. विद्या परिषदेच्या आधी अधिष्ठातांनी विभागप्रमुखांशी व विद्यार्थ्यांशी चर्चा करून बैठकीत मुद्दे मांडायचे आहेत. नियामक मंडळाच्या जूनमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला आहे.-भूपेंद्र कँथोला, संचालक-एफटीआयआय
शैक्षणिक परिषदेमधून विभागप्रमुखांना हटविले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 1:44 PM
जानेवारी २०१७ शैक्षणिक परिषदेमध्ये विद्यार्थ्यांनी शुल्क, अभ्यासक्रम, शिस्त असे अनेक मुद्दे मांडल्याने नियामक मंडळाने शैक्षणिक परिषदेमधून विद्यार्थी प्रतिनिधींना हटविले.
ठळक मुद्दे‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांचे आंदोलन : आज मुंबईत शैक्षणिक परिषद