पुणे : संक्रांतीचा सण जवळ आला की, पतंगबाजीला सुरुवात होते. यात चायनीज मांजा वापरल्याने पक्ष्यांचा प्राण तर जातोच, नागरिकांचे गळेही चिरले जाऊन निष्पाप जीव जात आहेत. या मांजावर बंदी असतानाही बाजारात ते मिळू लागले आहेत. अशातच पुण्यातील कसबा पेठेत शिरीष महाजन यांनी पक्षाच्या शरीराभोवती अडकलेला चायनीज मांजा काढून त्याला जीवदान दिल्याची कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
पुण्यात कसबा पेठेत तांबट हौद येथे एका वाड्याच्या पत्र्यावर मांजामध्ये कबुतर अडकले होते. त्यावेळी शिरीष महाजन यांनी मांजामधे अडकलेल्या पक्षाची काठीचा वापर करत सुटका करुन पक्षाच्या शरीराभोवती अडकलेला मांजा काढला व त्याला जीवदान दिले.
महाजन म्हणाले, कसबा पेठेतील तांबट हौद येथे एका वाड्याच्या पत्र्यावर चायनीज मांजामध्ये कबुतर अडकले होते. त्याच्याभोवती मांजा पूर्णपणे गुंडाळला गेला होता. मी काठीच्या साहाय्याने मांजाला धरून कबुतरला बाहेर काढले. त्यानंतर आमच्या भागात तांब्याची कामे करणाऱ्या कारागिरांकडून विशिष्ट कात्री आणली. कात्रीच्या साहाय्याने कबुतराच्या शरीराभोवती गुंडाळलेला मांजा कापण्यास सुरुवात केली. त्याला काही इजा होणार नाही अशा प्रकारे काळजी घेऊन सर्व मांजा कापला. त्याच्या पंखांना मांजामुळे थोडीफार इजा झाली होती. त्याठिकाणी हळद लावून पक्ष्याला सोडून दिले.
चायनिक मांजा वापरणे अत्यंत घातक
सध्या शहरात विविध टेकड्यांवर, पुलांवर पतंगबाजी केली जात आहे. त्यामध्ये चायनीज मांजाचा वापर होत आहे. गेल्या काही वर्षांपासून चायनीज मांजा कुठे झाडावर अडकला की, त्यामध्ये पक्षी अडकतात आणि पीळ बसून त्यांचा जीव जातो. बऱ्याचदा दुचाकीस्वार जाताना मांजा उठून आला की, त्यांच्या गळ्यावरच जातो. दुचाकीस्वार वेगात असतो आणि या मांजामुळे त्यांचा गळा चिरला जातो. ते गाडी थांबवेपर्यंत गळा चिरलेला असतो. यापूर्वी एक महिला शिवाजीनगर येथील पुलावरून जाताना तिचा गळा चिरल्याने जागीच मृत्यू झाला होता. गळ्यावरच श्वास नलिका असते आणि ती तुटल्याने रक्तप्रवाह खूप जातो. यात प्राण गमवावा लागतो. म्हणून चायनिक मांजा वापरणे अत्यंत घातक ठरत आहे.