पुणे : ''सौंदत्तीला गेले, देवीची पूजा केली, त्यांनी सांगितलं ते सगळं केलं पण जठ गेली नाही ती नाहीच ! आज तिला पूर्ण काढल्यावर बरं वाटतंय'' हे उद्गार आहेत पुण्यातल्या पार्वती केंदळे यांचे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे केंदळे यांची जठ गुरुवारी काढण्यात आली. त्यावेळी त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
पार्वती या जनता वसाहतीत कुटुंबासोबत राहतात. एका हॉटेलमध्ये मोलमजुरी करणाऱ्या पार्वती सुमारे ५० वर्षाहून अधिक काळ चार फुटाची जठ घेऊन वावरायच्या. कधीतरी लहान असताना आजारपणात हॉस्पिटलमध्ये निगा न राखल्याने त्यांच्या डोक्यात जठ आली. पुढे आजूबाजूच्यांना तुझ्या डोक्यावर देवी आल्याचे सांगितले आणि डोक्यातली जठ जणू त्यांच्या आयुष्याची सोबतीण बनली. काहीवेळा जड झाल्यावर ती आपोआप सुकून गळून पडायची. पण आजूबाजूला असलेल्या केसांपासून पुन्हा नवी जठ तयार व्हायची.जठ काढण्यासाठी त्या सौंदत्तीच्या डोंगरावर जाऊन आल्या. तिथे सांगितलेल्या पूजा केल्या. इतकेच नव्हे तर प्रत्येक पौर्णिमेला जठीची पूजाही करायच्या.तिला दही आणि दुधाने आंघोळ घालायच्या. हा प्रकार तब्बल ५० वर्ष सुरु होता.
त्यांच्या हॉटेलमध्ये येणारे अंनिसचे कार्यकर्ते माधव गांधी यांनी त्यांची ही धडपड बघितली आणि त्यांना जठ काढण्यासाठी उद्युक्त केले. पार्वतीबाई तयारही झाल्या पण त्यांची मुलगी काही तयार होईना. माझी आई आजारी पडेल या भीतीने ती जठ काढायला मान्यता देत नव्हती. अखेर खूप समाजवल्यावर त्यांनी होकार दिला आणि अंधश्रद्धेची बंधने झुगारून पार्वतीबाईंनी मोकळा श्वास घेतला. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय होता. मानेचा त्रास, केस धुताना होणारी अडचण या त्यांच्या सगळ्या अडचणी आता दूर झाल्या आहेत. आता खूप हलकं हलकं वाटतंय अशी त्यांची मोजक्या चेहऱ्याची प्रतिक्रिया खूप काही सांगून गेली. त्यांची जठ काढणाऱ्या अंनिसच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षा नंदिनी जाधव यांनी रात्री १२ वाजेपर्यंत केंदळे कुटुंबीयांची समजूत काढल्याची सांगितले. आपण यामुळे आजारी पडू अशी भीती त्यांना होती पण मागची उदाहरणे देऊन त्यांची समजूत घातल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुणे जिल्ह्यातील जठनिर्मूलनाची ही ५०वी केस असून यापुढेही हे काम अंनिसमार्फत असेच सुरु राहणार असल्याचे त्या म्हणाल्या.