बारामती (पुणे) : चिन्हाची फार चिंता करायची नाही. आजपर्यंत आपण १४ वेळा निवडणुका लढलो. त्यापैकी पाच निवडणुकांचे चिन्ह हे बैलजोडी, गाय वासरू, चरखा, हाताचा पंजा व घड्याळ अशी होती. मात्र चिन्ह काढून घेतलं म्हणजे त्या संघटनेचा अस्तित्व संपेल, असे कधी घडत नाही. सामान्य माणसाशी संपर्क कायम वाढला पाहिजे, त्याला पण नव्याने काय देऊ शकतो यावर विचार केला पाहिजे, यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे नव्याने वाटचाल करताना देखील फार अडचणी येणार नाहीत, असा विश्वास ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला.
बारामती येथील गोविंद बाग या त्यांच्या निवासस्थानी माळशिरस तालुक्यातील काही कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला. यावेळी पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, ज्याने पक्ष स्थापन केला. त्याच्याकडून पक्षच काढून घेण्याची घटना देशात प्रथमच घडली. मात्र राष्ट्रवादीच्या निमित्ताने असं प्रथमच घडलं आहे, मात्र संघटनेचे चिन्ह किंवा पक्ष गेल्यामुळे अस्तित्व संपत नाही. संघटनेचे चिन्ह किंवा पक्ष गेल्यामुळे अस्तित्व संपत नाही. पुन्हा नव्या जोमाने आपण राज्यात संघटना बांधणार असल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी देशामध्ये अनेकदा पक्षाच्या संदर्भात घडामोडी घडल्या, ज्याने पक्ष स्थापन केला त्याचाच पक्ष काढून घेणे हे कायद्याला धरून वाटत नाही, त्यामुळेच आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो आहे. त्याचा योग्य निकाल लागेल अशी अपेक्षा यावेळी पवार यांनी व्यक्त केली.