चाकणच्या आंबेठाण चौक ते भांबोली व करंजविहिरे येथील खिंड या मार्गाचे रुंदीकरण व सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्याचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. एमआयडीसीचा टप्पा क्रमांक दोनमधील आंतरराष्ट्रीय दर्जाची कारखानदारी याच प्रमुख मार्गावर असल्याने अवजड तसेच हलक्या वजनाची शेकडो वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती, यामुळे महाराष्ट्र शासनाच्या हायब्रिड अन्युटी योजनेंतर्गत या संपूर्ण रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. तर रस्त्याच्या दुतर्फा गटाराचे पाणी वाहून जाण्यासाठी बंदिस्त पाइपलाइन टाकण्यात येत आहे.
एमआयडीसीच्या टप्पा क्रमांक दोनसह खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील लोकांचे दळणवळण सुखकारक करण्यासाठी या रस्त्याचे उच्च दर्जाचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आल्याने रस्ता गुळगुळीत झाला आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये वाहनांची येजा करण्याची संख्या जास्त प्रमाणात आहे. यामध्ये अवजड मालवाहतूक करणारी वाहने तसेच कामगारांना ने आण करणाऱ्या बसेस तसेच हलकी चारचाकी व दुचाकी या वाहनांचा वेग मर्यादेपेक्षा जास्त वेग वाढला आहे. मागील दोन-तीन महिन्यांच्या कालावधीत चाकण आंबेठाण दरम्यानच्या झित्राईमळ्यात दोन जीवघेणे अपघात घडून तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर शेकडो जणांचे किरकोळ अपघात घडून जखमी व्हावे लागले आहे.
या मार्गाचे सिमेंट काँक्रीटीकरण केल्याने हा रस्ता गुळगुळीत झाला आहे. यामुळे कमी वेळात जास्त अंतर कापण्याचे प्रकार वाहनचालकांकडून होताना दिसत आहे. अनेक वाहनचालक वाहने अतिवेगाने पळवत आहेत.या वेगावर वेळीच नियंत्रण ठेवण्यासाठी काही ठराविक अंतरावर स्पीड ब्रेकर टाकण्याची सार्वजनिक बांधकाम व नगरपरिषदेला पत्र देऊन मागणी करण्यात आली आहे. - नितीन गोरे -अध्यक्ष, स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठान,खेड तालुका
चाकण ते भांबोली फाटा रस्त्याचे झालेले सिमेंट काँक्रीटीकरण.