खेड तालुक्याच्या पूर्व भागात वाफगाव येथे खेड पोलीस स्टेशन अंतर्गत वाफगाव दुरक्षेत्र पोलीस चौकी आहे. काही दिवसांपूर्वी या पोलीस चौकीची दुरवस्था झाली होती. चौकीच्या खिडक्या, दारे तुटलेली, छतावरील कौले फुटली होती. ठिकठीकाणी चौकीच्या इमारतीच्या भिंती ढासळल्या होत्या.या चौकीचा मुतारी म्हणून वापर होत होता. काही दिवसांपूर्वीच या चौकीची डागडुजी बांधकाम विभागाने केली. केवळ डागडुजीच नाहीतर इमारत प्रशस्तही करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाने खेड पोलीस ठाण्याला इमारत वापण्यायोग्य झाली आहे. असे पत्र दिले आहे. मात्र गेल्या कित्येक माहिन्यापासून ही पोलीस चौकी वापरात नसल्यामुळे धुळ खात पडून आहे. वाफगाव, गुळाणी, वाकळवाडी, वरुडे, कनेरसर, चिंचबाईवाडी, टाकळकरवाडी, गाडकवाडी हा परिसर डोंगराळ भागात असल्यामुळे या ठिकाणी भुरट्या चोरीच्या घटना घडत असतात. तसेच कौटुबिक भांडणे, नवरा बायकोची भांडणे, शेतजमिनीवरुन भांडणे तसेच हाणामाऱ्या , घरफोडी, चोऱ्यामाऱ्या या परिसरात नेहमी होत असतात. त्यामुळे पोलीस तत्काळ उपलब्ध होत नाही. रात्रीच्या वेळीही या ठिकाणी पोलीस कर्मचारी उपलब्ध असणे गरजेचे बनले आहे.
नागरिकांना तक्रार देण्यासाठी खेड पोलीस ठाणे गाठावे लागते. तक्रार दिल्यानंतर या परिसरातील बीट अंमलदार व, पोलीस कर्मचारी वेळेवर भेटत नाही. नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात. यामध्ये दोन्ही तक्रारदारांना विनाकारण त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे वाफगाव दुरक्षेत्र पोलीस चौकीत पोलीस कर्मचाऱ्याची नेमणूक करावी अशी मागणी वाफगावचे माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र टाकळकर, चिंचबाई वाडीचे माजी सरपंच संतोष गार्डी, गाडकवाडीचे सरपंच वैभव गावडे यांनी केली आहे.
२८ दावडी
वाफगाव येथील धुळखात पडलेली पोलीस चौकीची इमारत.