पुणे : भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाची साक्षीदार ठरलेल्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) मधील प्रभात स्टुडिओला ९० वर्षांचा इतिहास आहे. जुन्या काळातील आशियामधला सर्वांत मोठा स्टुडिओ अशी ख्याती असलेल्या या ऐतिहासिक वास्तूच्या पाऊलखुणा जतन करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली असून, प्रभातकालीन मुख्य स्टुडिओ क्रमांक एकचे नूतनीकरण आणि डागडुजी करण्याचे काम सुरू केले आहे. याशिवाय स्टुडिओतील काही बंद असलेल्या विभागांची रंगरंगोटी व साफसफाईचे काम देखील हाती घेतले आहे. हे विभाग विद्यार्थ्यांच्या वापरासाठी खुले केले जाणार आहेत.
भारतीय बोलपटांची निर्मिती करणाऱ्या ‘प्रभात फिल्म कंपनी’ची स्थापना व्ही. शांताराम, विष्णूपंत दामले, फत्तेलाल शेख, केशवराव धायबर आणि सीताराम कुलकर्णी यां खंद्या शिलेदारांनी केली होती. कंपनीचे पुण्यात बस्तान हलविल्यानंतर एफटीआयआयच्या परिसरात ‘प्रभात फिल्म स्टुडिओ’ची निर्मिती केली. या स्टुडिओ’ने भारतीय चित्रपटसृष्टीचा सोनेरी काळ अनुभवला. याविषयी प्रभात स्टुडिओचे संस्थापक विष्णूपंत दामले यांचे नातू अनिल दामले म्हणाले, प्रभात स्टुडिओच्या डागडुजीसाठी एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कँथोला यांनी पावले उचलल्याचा खूप आनंद आहे. स्टुडिओतील अनेक विभाग काही वर्षे वापरात नसल्यामुळे बंद होते. हेच विभाग पुन्हा उघडले आहे. त्याच्या साफसफाईचे आणि त्यात असलेल्या साहित्याच्या डागडुजीचे काम एफटीआयआयकडून करण्यात येत आहे. या विभागांमध्ये शुटिंगसाठी लागणारे दिवे ठेवण्यात आले होते. त्यात प्रभात काळातील दिव्यांचाही समावेश आहे. ते सगळे दिवे साफ करून व्यवस्थितपणे ठेवण्याबरोबरच मुख्य स्टुडिओमध्ये छायाचित्रणासाठी एक विभाग आणि त्याच्याजवळ प्रभातकालीन जी प्रयोगशाळा होती. तो भागही वापरात नव्हता. येथे साफसफाई व रंगरंगोटी करून त्यांनी कार्यालयीन उपयोगासाठी वापरले जाणार आहे. स्टुडिओच्या आत पाण्याचा हौद होता. येथेही अनेक चित्रपटांचे शुटिंग झालेले असून, हौदातील कारंजे बंद पडले होते. त्याला नवीन रुप दिले जात आहे. हौदातील पाईपलाईन बदलण्यात येत आहे.
------
प्रभात स्टुडिओच्या मूळ वास्तूला कोणताही धक्का न लावता त्याचा कायापालट न करता केवळ त्यातील बंद असलेले वेगवेगळे विभाग कसे वापरता येईल, याचा विचार करून एफटीआयआयकडून डागडुजी केली जात आहे. स्टुडिओत होणाऱ्या बदलांबद्दल नेहमीच एफटीआयआयकडून माहिती दिली जाते आणि सूचना मागविल्या जातात. जुन्या काळातील हा एकमेव स्टुडिओ आहे जो आजही वापरात आहे. त्यामुळे त्याचे जतन होणे आवश्यक आहे.
- अनिल दामले, नातू, विष्णूपंत दामले (प्रभात स्टुडिओचे संस्थापक)
---
भारतीय चित्रपटसृष्टीचा ऐतिहासिक वारसा ‘प्रभात स्टुडिओ’लाभला आहे. या वास्तूला हेरिटेज दर्जा देखील आहे. ही वास्तू जतन करणे हाच यामागील उद्देश आहे.
- भूपेंद्र कँथोला, संचालक एफटीआयआय
फोटो - तन्मय ठोंबरे फोल्डरमध्ये)