पुणे : ज्येष्ठ प्रतिभावंत, किराणा घराण्याच्या गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी, स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे (वय ९२) यांचे शनिवारी पहाटे पुण्यात निधन झाले. त्यांच्या पश्चात भाच्या मनीषा रवी प्रकाश, कल्पना वैद्य तसेच शिष्यपरिवार आहे. त्यांची अमेरिकास्थित भाची पुण्यात आल्यानंतर मंगळवारी पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. प्रभाताई या अग्रगण्य हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायिकांपैकी एक. त्या विजय करंदीकर, पं. सुरेशबाबू माने आणि हिराबाई बडोदेकर यांच्या शिष्या होत्या. ख्याल गायकीसोबत ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भजन व भावसंगीतावरही त्यांचे प्रभुत्व होते.
स्वतः करायच्या रचनाभारतीय शास्त्रीय संगीताचा जगभर प्रसार करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. त्या अनेकदा स्वत: रचलेल्या बंदिशी सादर करत. त्यांच्या काही रचना, जसे, मारू बिहाग रागातील ‘जागू मैं सारी रैना’, कलावती रागातील ‘तन मन धन’, किरवाणी रागातील ‘नंद नंदन’ या श्रोतृवृंदाच्या विशेष पसंतीच्या आहेत. प्रभाताईंनी अपूर्व कल्याण, मधुरकंस, पटदीप - मल्हार, तिलंग - भैरव, भीमकली, रवी भैरव यांसारख्या नव्या रागांची रचनाही केली आहे.
त्यांचं गाणं शुद्ध, स्वच्छ, निर्मळ अन् सुंदर... आता लाइव्ह ऐकता येणार नाही, याचं दु:खज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांचे जाणे ही एक अतिशय दु:खद घटना आहे. त्यांचे जाणे वेदनादायी आहे. त्यांनी अनेक वर्षे संगीताची सेवा केली. आमच्या घराण्याशी तर त्यांचे जवळचे नाते होते. त्या आमच्या घरी अनेक वर्षांपासून येत असत. माझ्या आजी- आजोबांच्या लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाला डॉ. प्रभा अत्रे यांचे गायन झाले होते, अशी आठवण मला आजीने सांगितली होती. तो अनुभव अतिशय हृद्य असाच असावा. त्यांचे अनेक रेकॉर्डिंग, गाणी मी ऐकली आहेत. त्यांची मारू बिहाग आणि कलावती अन् ठुमरी ऐकताना आपण मंत्रमुग्ध होऊन जातो. त्यांचे गाणे हे शुद्ध, स्वच्छ, निर्मळ, सुंदर सूर असलेले आणि रेखीव असे होते. त्यांनी बंदिशी रचल्या आणि गायल्या. तसेच उपशास्त्रीय रचना, अनेक भक्तिगीतं, भावगीतं एवढंच नव्हे तर गझला रचल्या, त्या संगीतबद्धदेखील केल्या आणि गायल्या. परंतु आता त्यांचं गायन लाइव्ह ऐकता येणार नाही हे मोठे दु:ख आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो. त्यांना आदरांजली वाहतो.- राहुल देशपांडेराष्ट्रीय पुरस्कार विजेतेशास्त्रीय गायक
त्या चिरतरुणच होत्या...प्रभाताई इतक्यात जातील असं वाटत नव्हतं, इतक्या त्या चिरतरुण होत्या. माझं गाणं ऐकायला त्या गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये पहिल्या रांगेत अगदी ताठ बसल्या होत्या. त्यांच्याकडे पाहून त्या ९२ वर्षांच्या आहेत, असं वाटायचं नाही. मी दहा वर्षांची असताना त्या माझ्या घरी आल्या होत्या. ५० वर्षांपासून मी त्यांना वेळोवेळी भेटते आहे. मारू बिहाग, कलावती व त्यांच्या बंदिशी या सर्वांची मोहिनी मनावर होती. अशा व्यक्ती भेटणं दुर्मिळच. त्या हव्या होत्या, राग निर्मितीसाठी, गायनासाठी.- आरती अंकलीकर,ज्येष्ठ शास्त्रीय गायिका.