पुणे : शहरात भाड्याने राहत असलेल्या नागरिकांना पासपोर्ट काढताना सध्याच्या पत्त्याचा पुरावा देताना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर पत्त्याचा पुरावा म्हणून घरमालकाशी केलेला भाडेकरार ग्राह्य धरण्यात यावा, असा प्रस्ताव पासपोर्ट विभागाच्या वतीने परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठविण्यात आलेला आहे.राज्याच्या विविध भागांतून शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने मोठ्या संख्येने पुण्यात येऊन भाड्याच्या घरात राहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पासपोर्ट काढताना गेल्या वर्षापासून वास्तव्य केलेल्या ठिकाणांची माहिती व त्याबाबतचे पुरावे सादर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना पासपोर्ट काढताना अडचणींचा सामना करावा लागत होता. यातून मार्ग काढण्यासाठी पुणे पासपोर्ट कार्यालयाने घरमालकाशी केलेला भाडेकराराला पत्त्याचा पुरावा म्हणून मान्यता द्यावी, असा प्रस्ताव तयार करून केंद्राकडे पाठविला असल्याची माहिती प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी अतुल गोटसुर्वे यांनी दिली.पासपोर्ट काढताना पत्त्याचा पुरावा म्हणून पाण्याचे बिल, टेलिफोन बिल, वीजबिल, बँक पासबुक, इन्कम टॅक्स असेसमेंट आॅर्डर, निवडणूक आयोग ओळखपत्र, गॅस कनेक्शन पुरावा, मान्यताप्राप्त कंपनीचे पत्र, पत्नीच्या पासपोर्टची प्रत, रेशनकार्ड, लहान मुलांसाठी पालकांच्या पासपोर्टची कॉपी, आधार कार्ड आदी १२ कागदपत्रे ग्राह्य धरली जातात. यांपैकी किमान एक पत्त्याचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे.मुंढवा कार्यालयामध्ये अपॉइंटमेंट घेऊन अर्ज जमा करण्यासाठी गेल्यानंतर अर्जदारांना साधारणत: अडीच ते तीन तासांचा कालावधी लागतो. तो वेळ कमी व्हावा, याकरिता आतमध्ये अर्ज स्वीकारण्याच्या व्यवस्थेत वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे गोटसुर्वे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पासपोर्टच्या पत्त्यासाठी भाडे करार ग्राह्य
By admin | Published: June 15, 2014 3:56 AM