पुणे : झूम कारच्या कस्टमर पोर्टलवरून एमएच २३ एएस ८७७७ ही स्कॉर्पिओ गाडी वैयक्तिक वापरासाठी बुकिंग केली. त्याबाबतचे १४ हजार रुपये ऑनलाइन भरून गाडी घेऊन गेला अन् ती गाडी परत न करता परस्पर पसार झाल्याचा प्रकार नऱ्हे परिसरात घडला आहे.
याप्रकरणी गोरखनाथ मोरे (वय ३७, रा. भोसरी) यांनी पोलिसांना फिर्याद दिली. त्यानुसार, मोरे यांच्या कंपनीचे होस्ट ऋषिकेश बांगर यांची १८ लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची महिंद्रा स्कार्पिओ गाडी झूम कार कंपनीअंतर्गत भाडेतत्त्वावर घेतली होती.
आरोपी दिनेश कुमार (रा. उत्तर प्रदेश) याने गाडीचे बनावट कागदपत्रे सादर करून कंपनीसोबत करारनामा केला. कंपनीचा विश्वास संपादन करून संबंधित पाच दिवस स्कॉर्पिओ गाडी वापरण्यासाठी घेतली. ही गाडी अटीनुसार वापरणे बंधनकारक असताना विश्वासघात करून ती परत न करता आर्थिक फसवणूक केली. याबाबत सिंहगड रोड पोलिस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक यादव पुढील तपास करत आहेत.