कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनचा फटका पालिकेच्या आर्थिक उत्पन्नालाही बसलेला आहे. मिळकत कर विभाग वगळता बांधकाम विभागासह अन्य विभागांचे उत्पन्न घटलेले आहे. कोरोनावर पालिकेचा शेकडो कोटींचा खर्च झालेला आहे. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत अवघी १२५ कोटींच्या आसपास रक्कम शिल्लक आहे. त्यामुळे पालिकेचे उत्पन्न वाढविण्याच्या विविध उपाययोजना केल्या जात आहेत. स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी २७ कलमी कार्यक्रम राबविणार असल्याचे यापुर्वीच सांगितले आहे.
पालिकेच्या मालकीच्या सदनिका आणि अॅमेनिटी स्पेस विकण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने आणला होता. परंतु, या प्रस्तावाला विरोधी पक्षांसह सामाजिक संघटनांनी विरोध केला होता. त्यामुळे या जागा न विकतान दिर्घ मुदतीसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. जागांची मालकी पालिकेकडे राहण्यासोबत्च भाड्यापोटी महसूल पालिकेला मिळणार असल्याचे रासने म्हणाले.