पुणे : मुसळधार पावसामुळे मिरज - कोल्हापूर सेक्शनमध्ये जवळपास ९०० मीटर अंतराचा ट्रॅक खचला होता. गेल्या पाच दिवसापासून रेल्वे प्रशासनाने युद्ध पातळीवर प्रयत्न करून रविवारी तो ट्रॅक पूर्ववत केला. रूळांखालील खडी, वाळू, माती वाहून गेल्याने हा ट्रॅक धोकादायक झाला होता. त्यामुळे रेल्वे सेवा प्रभावित झाली.
रविवारी तो ट्रॅक सुरळीत करण्यात आला. यासाठी इंजिनियरींग विभागाचे जवळपास १५० कर्मचारी काम करीत होते. पुणे रेल्वे विभागातील मिरज - कोल्हापूर सेक्शनमध्ये पंचगंगा नदीवरील पुलापासून दोन किमीच्या अंतरावर या ट्रॅकचे मोठे नुकसान झाले होते.
त्यामुळे कोल्हापूरला जाणाऱ्या अनेक गाड्या ह्या मिरज स्थानकापर्यंतच धावत होत्या. त्यामुळे लवकरात लवकर हा मार्ग पूर्ववत करून वाहतूक सुरु करणे रेल्वे पुढे आव्हान होते. ते इंजियनरिंग विभागाने कमी वेळेत पूर्ण केले. रविवारी हा ट्रॅक वाहतुकीसाठी योग्य झाल्यानंतर चाचणीसाठी पहिल्यांदा इंजिन धावले, नंतर मालगाडी आणि मगच प्रवासी गाड्या धावण्यास सुरुवात होईल.