डिंभे: पावसाळ्यातील दिवसांत अतिवृष्टीपासून घरांचे संरक्षण व्हावे यासाठी पावसाळळ्यापूर्वी घरांची डागडूजी करण्याची पारंपरिक प्रथा आदिवासी भागात आहे. पावसाळ्यातील चार महीने अतिपावसापासून घरांचे संरक्षण व्हावे हाच या मागचा उद्देश असतो. आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात याला ‘घरे शेकारणे’ असे म्हटले जात असून सध्या या भागातील नागरिक घरे शेकारण्याच्या कामात गुंतल्याचे पाहायला मिळत आहे.
कोकणापासून ते थेट सह्याद्रीच्या पर्वत रांगात पसरलेल्या घाटमाथ्यावर सर्वत्र केली जातात. स्थानिक भाषेनुसार याला वेगवेगळी नावे असली तरी सर्वांचा उद्देश मात्र पावसाळ्यात घरांचे संरक्षण हाच आहे.
घर शेकारणे म्हणजे काय?
पावसाळा सुरू होण्यापूर्वी घरांची कौले बदलून नविन कौले टाकली जातात. घराच्या भोवताली एका विशिष्ट प्रकारच्या झुडपापासून मिळणा-या झावळ्यांनी घरे शेकारली जातात. यामुळे अति पाऊस व जोरदार वा-यापासून घराच्या भींतींचे संरक्षण होते. घरे शेकारणीमुळे पावसाळ्याचे चार महीने कितीही पाऊस झाला तरी घराची ऊब कायम राहते.
कोकण व घाटमाथ्यावरील अतिपावसाच्या भागात घरांचा अकार चौमवळी स्वरूपाचा असतो. सतत दिवसरात्र जोरात कोसळणा-या पावसाचे पाणी जलदगतीने खाली उतरण्यासाठी या प्रकारची घरे बांधली जातात.
आंबेगांव तालुक्याच्या आदिवासी भागात सध्या पावसाळ्यापूर्वीच्या शेतीच्या मशागतीच्या कामांसोबतच घरे शेकारणीच्या कामांनीही वेग घेतला असून आहुपे, पाटण खो-यात ही कामे उरकण्यासाठी लगभग सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.