पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ७५ टक्के हजेरी न भरणा-या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न देण्याचा निर्णय घेण्यापूर्वी नियमानुसार एक महिन्याची नोटीस का दिली नाही, याचा खुलासा विद्यापीठाने अद्याप केलेला नाही. त्यामुळे याबाबत उचित कार्यवाही करून त्याचा अहवाल दोन दिवसांत सादर करण्याचे निर्देश मंगळवारी पुन्हा एकदा उच्च शिक्षण संचालनालयाने विद्यापीठाला दिले आहेत.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाने अचानक ७५ टक्के हजेरीच्या नियमावर बोट ठेवून अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा बसण्यास मनाई केली आहे. याप्रकरणी विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने यांच्याकडे तक्रार केली आहे. मराठी विभागाने विद्यापीठ परिपत्रक २३-२०१० मधील अध्यादेश ६९ नुसार कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे याप्रकरणी खुलासा करण्याचे पत्र धनराज माने यांनी ६ डिसेंबर २०१२ रोजी विद्यापीठाला दिले होते. त्यानंतर ६ दिवस उलटले, तरी अद्याप विद्यापीठ प्रशासनाने काहीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. मोहन खताळ यांनी पुन्हा एकदा मंगळवारी विद्यापीठाला याबाबत उचित कार्यवाही करण्याचे स्मरणपत्र पाठविले आहे.विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाहीविद्यार्थ्यांची हजेरी न भरल्याने, परीक्षेला बसता न आल्याने त्यांचे वर्ष वाया जाऊन नुकसान होणार नाही, यासाठी पावलेउचलली जात आहेत. त्यांना पुन्हा एकदा परीक्षेची संधी उपलब्धकरून दिली जाऊ शकते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये क्रेडिट बेस परीक्षा पद्धतीचा अवलंब केला जात आहे. याअंतर्गत विभागांना परीक्षा घेण्याची स्वायत्तता देण्यात आलेली आहे. उच्च शिक्षण विभागाने पाठविलेल्या पत्राबाबतचा खुलासा येत्या २ दिवसांत केला जाईल.- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
दोन दिवसांत अहवाल देण्याचे पुन्हा निर्देश, उच्च शिक्षण संचलनालयाचे पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 3:36 AM