लोकसभा निवडणूक निकालाचे पडसाद?; युगेंद्र पवारांचे पंख छाटण्याचे प्रयत्न, बारामतीत काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 03:06 PM2024-06-06T15:06:16+5:302024-06-06T15:47:00+5:30

लोकसभा निवडणुकीदरम्यान बारामतीत सक्रिय राहिलेले युगेंद्र पवार बारामतीतून अजित पवारांविरोधात आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याचं बोललं जात आहे.

Repercussion of baramati Lok Sabha election result ajit pawar vs yugendra pawar | लोकसभा निवडणूक निकालाचे पडसाद?; युगेंद्र पवारांचे पंख छाटण्याचे प्रयत्न, बारामतीत काय घडलं?

लोकसभा निवडणूक निकालाचे पडसाद?; युगेंद्र पवारांचे पंख छाटण्याचे प्रयत्न, बारामतीत काय घडलं?

Yugendra Pawar ( Marathi News ) : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी दणदणीत यश मिळवलं आहे. बारामतीची यंदाची निवडणूक ऐतिहासिक ठरली. कारण या मतदारसंघात मागील तीन टर्मपासून खासदार असलेल्या सुळे यांना यंदा मात्र कुटुंबातूनच आव्हान मिळालं होतं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी त्यांच्याविरोधात निवडणूक लढवली. मात्र पवार कुटुंबातील इतर सदस्यांनी नेहमीप्रमाणे सुप्रिया सुळे यांनाच साथ दिली. यामध्ये अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांचाही समावेश होता. लोकसभा निवडणुकीदरम्यान बारामतीत सक्रिय राहिलेले युगेंद्र पवार यांनी बारामतीतून अजित पवारांविरोधात आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याचं बोललं जात आहे. अशातच आता युगेंद्र यांच्याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

अजित पवारांचे पुतणे असणारे युगेंद्र पवार हे बारामती कुस्तीगीर संघाचे अध्यक्षही आहेत. मात्र  नुकत्याच झालेल्या कुस्तीगीर संघाच्या बैठकीत युगेंद्र पवार यांना अध्यक्षपदावरून हटवण्याचा निर्णय झाल्याचे समजते. ते या बैठकीला हजर नसल्याने इतर सदस्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. मात्र याबाबतची अधिकृत माहिती माझ्यापर्यंत आली नसल्याचं युगेंद्र पवार यांनी सांगितलं आहे.

"कुस्तीगीर संघाच्या सदस्यांची बैठक झाली आहे. मात्र त्यामध्ये काय निर्णय झाला, याबाबतची माहिती मला देण्यात आलेली नाही. जेव्हा तशी काही माहिती देण्यात येईल, त्यानंतर आमची भूमिका जाहीर करू," असं युगेंद्र पवार यांनी म्हटलं आहे.

युगेंद्र पवार उतरणार बारामतीच्या आखाड्यात?

लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर बारामतीच्या राजकारणाची दिशाच बदलून गेली आहे. बारामतीकरांनी थोरल्या पवारांना काैल दिल्याने येथील राजकारण ढवळून निघाले आहे. या निकालाचे दूरगामी परिणाम बारामतीवर होण्याचे संकेत आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात पायाला भिंगरी बांधून मतदारसंघ पिंजून काढण्यात विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त युगेंद्र पवार यांचा महत्त्वाचा सहभाग राहिला. बारामतीच्या निकालाने आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार गटाच्या वतीने युगेंद्र पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अधिक बळावली आहे.
 
निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार, भावजय शर्मिला पवार, तसेच पुतणे युगेंद्र पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला. यामध्ये पवार दाम्पत्याने इंदापूर, तर युगेंद्र यांनी बारामतीत लक्ष घातले. शहरातील प्रत्येेक गल्लीत, भागात त्यांनी पायी फिरत प्रचार केला, बारामतीकरांशी संवाद साधत मतदानाचे आवाहन केले. बारामतीच्या विकासात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या असणाऱ्या योगदानाबाबत त्यांनी जाहीर भाषणातून सांगितले. यावरून चुलते अजित पवार आणि त्यांच्यात कलगीतुरादेखील रंगला. बारामती स्थानिक पक्ष कार्यालयाची सूत्रे त्यांनी पहिल्या दिवसापासून हाती घेतली. नवीन पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विश्वासात घेत प्रचारात उतरविण्याची महत्त्वाची भूमिका त्यांनी पार पाडली.


मतदान संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते पक्ष कार्यालयात पोहोचले. ग्रामीण, शहरी भागातील नागरिकांच्या प्रचारादरम्यान निदर्शनास आलेल्या विविध समस्यांवर त्यांनी काम करण्यास सुरुवात केली आहे. जिरायती भागातील पाणी समस्येवर त्यांनी सध्या लक्ष केंद्रित केले आहे. शरयु फाउंडेशनच्या माध्यमातून टॅंकर सुरू करून पाण्याची गरज भागविली जात आहे. वादळी पावसाने नुकसान झालेल्या बाबुर्डी येथील शेतकऱ्यांना घर दुरुस्तीचे साहित्य त्यांनी पुरविण्यास पुढाकार घेतला. बारामतीकरांशी जनसंपर्क वाढविण्यास त्यांनी भर दिला आहे. प्रत्येक गुरुवारी ते पक्ष कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत. त्यासाठी नागरिकांना अपाॅइंटमेंट घेण्याची गरज नसल्याचेदेखील त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे युगेंद्र पवार यांनी एकप्रकारे विधानसभा निवडणुकीचीच तयारी केल्याचे मानले जाते. सुप्रिया सुळे यांना बारामतीतून सर्वाधिक मताधिक्य मिळाले. त्यामुळे त्यांनी बारामतीत केलेल्या प्रचाराचीच सुळे यांच्या विजयाच्या रूपाने पावती मिळाली आहे. त्यामुळे बारामती लोकसभेच्या निकालानंतर त्यांच्या विधानसभा उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत काका-पुतण्यात लढत झाल्यास आश्चर्य वाटणार नाही.

Web Title: Repercussion of baramati Lok Sabha election result ajit pawar vs yugendra pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.