पुणे: राज्यात पुन्हा एकदा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी ४१ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांचाही समावेश आहे. प्रसाद यांची जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आयुष प्रसाद यांनी आपल्या कार्यकाळात महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. त्यापैकी एक म्हणजे प्रशासकीय कामाकाजात सुधारणा घडवून आणली. शिक्षकांची बदली प्रक्रिया ऑनलाईन करण्यामध्ये त्यांचा प्रमुख सहभाग होता. त्याचबरोबर १०० दिवसांमध्ये विकासकामांचा निधी संपवण्याचा उपक्रम देखील त्यांनी घेतला होता. कोरोनाकाळामध्ये ग्रामीण भागात कोविड केअर सेंटर उभारून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे मुलींसाठी निवासी शाळा देखील त्यांच्याच कार्यकाळात उभारण्यात आली आहे. जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण वाढत होते. विविध उपययोजना करत जिल्ह्याची कुपोषणमुक्तीकडे वाटचाल केली. याशिवाय मुलांची गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम देखील त्यांनी राबविल्यामुळे मुलांच्या गुणवत्तेत वाढ देखील झाली. आयुष प्रसाद यांनी जळगावला जिल्हाधिकारी म्हणून बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी महसूल व वन विभागाचे सहसचिव रमेश चव्हाण यांची नेमणूक करण्यात आली आहे.