पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) प्रारूप विकास आराखडा २ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आला. विकास आराखडा बनवण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे होती ते महानियोजनकार अभिराज गिरकर यांच्या बदली आदेश राज्याच्या नगर विकास विभागाने बुधवारी रात्री उशिरा काढले आहेत.
पीएमआरडीएच्या विकास आराखड्याची (डीपी) जबाबदारी अभिराज गिरकर यांच्याकडे होती. विकास आराखडा जाहीर झाला असून त्यावर आतापर्यंत नऊ हजारांहून अधिक हरकती आणि सूचना आल्या आहेत. त्यात चुकीच्या पद्धतीने आरक्षण टाकल्याचे नागरिकांच्या असंख्य तक्रारी दाखल झाल्या आहेत.
मागील एक वर्षापूर्वी गिरकर यांची पीएमआरडीएमध्ये नियुक्ती झाली होती. त्यांच्याकडे विकास आराखडा तयार करण्याचे काम सोपविण्यात आले होते. विकास आराखडा प्रसिद्ध होताच त्यांची बदली मंत्रालयात नगर विकास विभागाचे सहसचिव या पदावर केली आहे. बदलीचे आदेश नगर विकास विभागाचे उपसचिव विजय चौधरी यांनी काढले आहेत.