पुणे : वर्षानुवर्षे एकाच पदावर कार्यरत असूनही कार्यक्षमता न दाखविणारे अधिकारी व कर्मचारी एसटी महामंडळाच्या रडारवर आले आहेत. दापोडी येथील एसटीच्या मध्यवर्ती कार्यशाळेतील काही अकार्यक्षम अधिकाऱ्यांना बदलीची शिक्षा देण्यात आली आहे. तसेच त्यांची प्रशासकीय चौकशीही सुरू करण्यात आल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, यातील काही अधिकाऱ्यांबद्दल भ्रष्टाचार व कामातील अनियमितेच्या तक्रारी आहेत. एसटी महामंडळाच्या मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयासह राज्यभरातील मध्यवर्ती कार्यशाळा, विभागीय कार्यालये, आगार याठिकाणी अनेक अधिकारी - कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. काही अधिकारी-कर्मचारी तर २० वर्षाहून अधिक काळ एकाच ठिकाणी आहेत. मध्यवर्ती कार्यालयाच्या एका बदली आदेशानुसार वषार्नुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या अशा दापोडी मध्यवर्ती कार्यशाळेतील सात अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. तसेच त्यांना तातडीने नव्या ठिकाणी रुजू होण्यास सांगून त्यांची प्रशासकीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. या घटनेमुळे एसटी प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे. मध्यवर्ती कार्यालयाने आज काढलेल्या बदली आदेशामुळे अनेक प्रस्थापितांना धक्का देण्यात आला आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. स्वत:च्या स्वार्थासाठी स्थानिक पुढाऱ्यांचे हितसंबंध जोपासत आपली तुंबडी भरणाऱ्या, अनेक वर्ष एकाच पदावर कार्यरत राहून वेळोवेळी कृष्णकृत्य करणाऱ्या या अधिकाऱ्यांची प्रशासकीय चौकशी देखील लावण्यात आल्याने यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. प्रशासनाची कार्यक्षमता वाढवणे आणि उत्पन्न वाढीसाठी कसून प्रयत्न करणे, यासाठी राज्यभरातील अशा अनेक एसटीच्या कार्यालयांमध्ये वेगळ्या कारणांनी वषार्नुवर्षे ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांवरही ही कारवाई केली जाणार आहे. त्याची सुरूवात दापोडी मध्यवर्ती कार्यशाळेपासून करण्यात आल्याचे एसटी महामंडळाच्या प्रसिध्दीपत्रकात नमुद करण्यात आले आहे.---------------मध्यवर्ती कार्यशाळेतील बदली करण्यात आलेली अधिकारी (कंसात सध्याचे पद)प्रियदर्शनी वाघ (भांडार अधिकारी), अजितसिंह राजपुत (सहायक अधिक्षक), अंकुश रेणके (सहायक अधिक्षक), विजय सोनवणे (सहायक भांडारपाल), अमिर गुलाब सय्यद (सहायक भांडारपाल), संजय यादव (प्रमुख कारागीर), मिलिंद तिकोणे (सहायक कारागीर).------------अनेक वर्ष एकाच पदावर राहूनही कार्यक्षमता न दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांवर एसटीची नजर राहणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सहा वर्ष एकाच पदावर असलेले अधिकारी-कर्मचारी आहेत. सध्या कारवाई करण्यात आलेल्या काही अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. कमी प्रतीच्या मालाची जाणीवपुर्वक खरेदी करणे, निविदाप्रक्रियेत अनियमितता, तसेच स्वत:च्या फायद्यासाठी काम करत असल्याचे गंभीर आरोप काही जणांवर आहेत. या आरोपांमध्ये सकृतदर्शनी तथ्य असल्याचे आढळून आल्याने त्यांची बदली करून चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती एसटीतील अधिकाऱ्यांनी दिली.
एसटीच्या मध्यवर्ती कार्यशाळेतील अकार्यक्षम अधिकारी-कर्मचाऱ्यांना बदलीची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 8:56 PM
एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या दापोडी मध्यवर्ती कार्यशाळेतील सात अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली
ठळक मुद्देकाही अधिकाऱ्यांबद्दल भ्रष्टाचार व कामातील अनियमितेच्या तक्रारी अधिकारी-कर्मचारी तर २० वर्षाहून अधिक काळ एकाच ठिकाणी