---------
कळस : इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी येथील वनक्षेत्रात दोन चिंकारा हरणांच्या झालेल्या शिकार प्रकरणाचा तपास जलदगतीने करावा, यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. दरम्यान, हा तपास सीआयडीकडे सोपवण्यात यावा, अशी स्थानिकांनी मागणी केली आहे. या घटनेचा निषेध म्हणून काळ्या फिती लावण्यात आल्या. त्यानंतर चिंकाऱ्याला श्रद्धांजली वाहण्यात आली.
शनिवार (दि. १८) रोजी सकाळी सकाळी सहाच्या सुमारास चारचाकी आलिशान पांढऱ्या रंगाच्या गाडीमधून आलेल्या शिकारींनी दोन चिंकारा हरणांची शिकार केली. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली. सतत होणारी चिंकाराची शिकार मोठी चिंतेची बाब बनली आहे. माहितीनुसार येथील शेतकऱ्यानी एक टाटा हॅरिहर ही अलिशान गाडी (१४ सिरीज पासिंग) दिसल्याचा दावा केला आहे. छऱ्याच्या बंदुकीतून गोळ्या झाडून चिंकारा हरणाला जागीच जायबंदी करण्यात आले आणि दोन चिंकारा हरणांची शिकार करत गाडीत घालून त्यांनी पलायन केले असे प्रत्येकदर्शीनी सांगितले. एका शेतकऱ्याने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात वाहन दिसत असून तीन अज्ञात व्यक्तींवर वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी सकाळी घटना स्थळाजवळ असलेल्या वनचौकी येथे फ्रेंड्स ऑफ नेचर क्लब व चिंकारा बचावचे भजनदास पवार, फ्रेंड्स ऑफ नेचर क्लब ॲड. सचिन राऊत, सर्जेराव जाधव, ॲड. श्रीकांत करे, ॲड. रोहित लोणकर, राजू भोंग, विकी जगताप, धनंजय राऊत, संजय चव्हाण यांनी दंडाला काळ्या फिती लावून घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करीत घटनेचा तातडीने शोध लावावा अशी मागणी केली.
या वेळी ॲड. राऊत म्हणाले की, येथील घटनेचा तपास हा सीआयडीकडूनच झाला पाहिजे. ॲड. करे म्हणाले की, चिंकाराबरोबरच ससे, घोरपडी, यांच्या शिकारी मोठ्या प्रमाणात आहेत, त्या वनविभागाने तातडीने थांबवल्या पाहिजेत. अखिल भारतीय ग्राहक संघटनेचे संघटक सर्जेराव जाधव यांनी या शिकार घटनेमध्ये कदाचित वनविभागाचा हात असल्याचा आरोप करत याची कसून चौकशी करण्याची मागणी केली. दरम्यान, याठिकाणी पुण्याचे सहायक वनसंरक्षक आशितोष शेंडगे व दक्षता विभागाचे विभागीय अधिकारी राम धोत्रे यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे.
--
फोटो ओळी : २०कळश चिंकारा शिकार
कडबनवाडी (ता. इंदापूर )येथे काळ्या फिती लाऊन आंदोलन करताना फ्रेंड्स ऑफ नेचर क्लबव चिंकारा बचाव
चे कार्यकर्ते.