पुणे : कोंढवा येथील सीमाभिंत कोसळून तब्बल १५ बांधकाम मजुरांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल येत्या ८ दिवसांत मिळणे अपेक्षित आहे. संबंधित विकसकासह अधिकारी जरी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा कामगार राज्यमंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे यांनी दिला. पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित ‘आपत्ती व्यवस्थापन व कामगारांचे हक्क’ या विषयावरील वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. कोंढवा आणि आंबेगाव येथे सीमाभिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या चौकशीसाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. याविषयी बोलताना भेगडे म्हणाले, की कोंढवा आणि आंबेगाव येथे झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांची नोंदणी झाली नव्हती. त्यानंतरही मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये दिले जातील. इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळामार्फत नोंदणी अभियानदेखील राबविण्यात येत आहे. ‘कामगार विभागाच्या कामाला गती देण्यासाठी येथील कामगार उपायुक्तालयासाठी नवीन इमारत उभारण्यात येणार आहे. त्याची कार्यालयीन कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. राज्यात १३ लाखांहून अधिक आणि पुणे विभागात १३ हजार ४८४ कामगारांची नोंदणी झाली आहे. महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदित कामगारांनी अर्ज केल्यास १५ दिवसांत त्यांचा अर्ज निकाली काढण्यात येईल, असे भेगडे यांनी सांगितले.
कोंढवा दुर्घटनेचा अहवाल आठ दिवसांत: बाळा भेगडे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 1:06 PM
कोंढवा आणि आंबेगाव येथे झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांची नोंदणी झाली नव्हती.
ठळक मुद्दे दोषींवर कठोर कारवाई करणार इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळामार्फत नोंदणी अभियानराज्यात १३ लाखांहून अधिक आणि पुणे विभागात १३ हजार ४८४ कामगारांची नोंदणी कामगारांनी अर्ज केल्यास १५ दिवसांत त्यांचा अर्ज निकाली काढणार