पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीतर्फे मुरुड जंजिरा येथील घटनेची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली जाणार असून, त्यात समोर येणाऱ्या दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. त्याचप्रमाणे दुर्घटनेच्या ठिकाणाचा आढावा घेऊन संस्थेतर्फे समुद्रकिनाऱ्यावर सूचनाफलक लावले जाणार आहेत, अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष पी. ए. इनामदार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.मुरुड येथील दुर्घटनेत दगावलेलेल्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने बुधवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. या प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, पी. ए. इनामदार, आबेदा इनामदार, सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. संजयकुमार दळवी आदी उपस्थित होते. श्रद्धांजली सभेनंतर इनामदार यांनी पत्रकारांशी संवाद साधून संस्थेच्या वतीने केल्या जाणाऱ्या कामांची माहिती दिली. इनामदार म्हणाले, की संस्थेने घडलेल्या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. समुद्रकिनाऱ्यावर शासनाच्या वतीने ज्या गोष्टी करणे अपेक्षित आहेत, त्या गोष्टींचा आढावा घेऊन संस्थेच्या वतीने प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावासह सूचनाफलक अपघाताच्या ठिकाणी लावले जातील. मुले समुद्रात बुडाल्याचे समजताच संस्थेच्या वतीने घटनास्थळी सर्वतोपरी मदत पोहचविण्यात आली. विद्यार्थ्यांचे मृतदेह आणण्यासाठी १४ रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली होती. संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह महाविद्यालयाचे कर्मचारी घटनास्थळी बसून होते. त्यामुळे महाविद्यालयांकडून मुलांना वाऱ्यावर सोडण्यात आले, असे पालकांकडून केले जाणारे आरोप चुकीचे आहेत. पाच ते दहा वर्षे सहलीला जाण्याचा अनुभव असलेले शिक्षक विद्यार्थ्यांबरोबर होते. त्यांची पूर्ण काळजी घेतली जात होती.संस्थेच्या वतीने घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी कायदेतज्ज्ञ, माजी प्राचार्य, अनुभवी विश्वस्त यांच्यासह विद्यापीठाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या एका सदस्याचा समावेश असलेली समिती स्थापन केली जाईल, असे इनामदार यांनी स्पष्ट केले.
महिनाभरात अहवाल देऊ
By admin | Published: February 04, 2016 1:41 AM