पुणे : शहरी व ग्रामीण भागात वीजतारा तुटणे, झोल पडणे किंवा जमिनीवर लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फीडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खोदाईमुळे भूमिगत केबल उघड्यावर पडणे आदी प्रकार घडतात. अशा धाेकादायक स्थितीची माहिती तत्काळ व्हॉट्सॲपद्वारे कळवा आणि धाेका टाळा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
नागरिकांनी सदर माहिती छायाचित्रांसोबत संबंधित स्थळाचा संपूर्ण पत्त्याचा उल्लेख करून किंवा लोकेशनसह व्हॉट्सॲपवर पाठवल्यास ती माहिती लागलीच संबंधित विभागीय व उपविभागीय कार्यालयात पाठविली जाते. त्यावर दुरुस्तीचे काम झाल्यानंतर संबंधित तक्रारकर्त्यांनाही त्याबाबतची माहिती व्हॉट्सॲपद्वारे छायाचित्रांसह कळविण्यात येत आहे.
काही तक्रारींचे निवारण करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयांची मंजुरी, निधी किंवा शिफ्टिंगची गरज असल्यास तसे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येतील. त्याबाबत संबंधित तक्रारकर्त्यांना कळविण्यात येणार आहे. महावितरणच्या या उपक्रमाला सार्वजनिक वीज सुरक्षेसाठी प्रतिसाद द्यावा व सहकार्य करावे, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.
पुणे परिमंडल अंतर्गत पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह हवेली तालुका तसेच मुळशी, वेल्हे, मावळ, खेड, जुन्नर व आंबेगाव तालुक्यासाठी ७८७५७६७१२३ तसेच बारामती मंडल अंतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, भोर व पुरंदर या तालुक्यांसाठी ७८७५७६८०७४ हा व्हॉट्सॲप मोबाइल क्रमांक महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे.
सोलापूर जिल्ह्यासाठी ७८७५४४०४५५, कोल्हापूर- ७८७५७६९१०३, सांगली- ७८७५७६९४४९ आणि सातारा जिल्ह्यासाठी ७८७५७६८५५४ हा व्हॉट्सॲप मोबाइल क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. या सर्व क्रमांकांवर फक्त वीज वितरण यंत्रणेपासून सुरक्षेचा धोका असल्याचा फोटो व संपूर्ण पत्ता किंवा लोकेशनसह माहिती/तक्रारी स्वीकारण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी कॉल करण्याऐवजी फक्त व्हॉट्सॲपद्वारे माहिती द्यावी. तसेच ज्या नागरिकांकडे व्हॉट्सॲप नाहीत त्यांनी ‘एसएमएस’द्वारे संबंधित मोबाइल क्रमांकावर माहिती दिल्यास त्याचेही निराकरण करण्यात येणार आहे.
यासोबतच २४ तास सुरू असणाऱ्या १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ आणि १९१२ या महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल.