पुणे : बाणेरमधील महापालिकेच्या मालकीची पाण्याची टाकी परस्पर पाडून पावणेदोन गुंठे जागा शेजारच्या जागामालकांनी बळकाविल्याचे ‘लोकमत’ने पुराव्यानिशी उजेडात आणल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. या जागेचा सर्व्हेलन्स रिपोर्ट मालमत्ता व व्यवस्थापन विभागाकडून मागविला आहे. पाणीपुरवठा विभागाने मात्र याच्याशी संबंध नसल्याचे स्पष्ट करून जबाबदारी झटकली आहे.बाणेरच्या जागेचा विषय पाणीपुरवठा, मालमत्ता व व्यवस्थापन तसेच बांधकाम परवाना विभागाशी संबंधित आहे. या जागेवर पाण्याची टाकी असल्याने १९९७ मध्ये बाणेर गाव महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर ही जागा पाणीपुरवठा विभागाच्या ताब्यात देण्यात आली. बाणेरकरिता नवीन टाकी बांधल्यानंतर २०१२ नंतर या टाकीचा वापर बंद झाला. त्यानंतर या जागेचे मालमत्ता व व्यवस्थापन विभागाकडे हस्तांतर करणे आवश्यक होते. त्यानुसार ते हस्तांतर झाले आहे का, याची माहिती घेतली जात आहे. मात्र, या टाकीचा वापर बंद असल्याने आमचा आता या जागेशी काही संबंध नव्हता, असे स्पष्ट करून पाणीपुरवठा विभागाने जबाबदारी झटकली आहे.पाणीपुरवठा विभाग, बांधकाम विभाग यांच्याकडून जागेसंदर्भात माहिती घेण्यात येत असल्याचे या विभागाचे प्रमुख सतीश कुलकर्णी यांनी सांगितले.
‘त्या’ जागेचा त्वरित सर्व्हेलन्स रिपोर्ट द्या
By admin | Published: April 10, 2015 5:43 AM