पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे येत्या १० एप्रिलपासून घेतल्या जाणाऱ्या प्रथम ते अंतिम वर्षाच्या प्रथम सत्राच्या परीक्षांसाठी मार्गदर्शक सूचना विद्यापीठातर्फे प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. परीक्षा झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना संबंधित विषयात मिळालेले गुण ४८ तासांच्या आत ‘स्टुडंट प्रोफाइल सिस्टीम’मध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यानंतर पुढील ४८ तासांत विद्यार्थ्यांच्या अडचणी व शंका आणि तक्रारी त्याच ठिकाणी नोंदवता येणार आहेत. स्टुडंट प्रोफाइल सिस्टीममध्ये नोंदविलेल्या तक्रारींची शिवाय इतर कोणत्याही तक्रारी स्वीकारल्या जाणार नाहीत, असे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
विद्यापीठातर्फे येत्या ५ ते ९ एप्रिलपर्यंत सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत मॉक टेस्ट देता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचा सराव करणे शक्य होणार आहे. ऑनलाइन परीक्षेत काही तांत्रिक कारणाने खंड पडल्यास तेवढाच कालावधी संबंधित विद्यार्थ्याला संगणकीय प्रणालीतून वाढून दिला जाणार आहे. तसेच यापूर्वी सोडलेली उत्तरे सेव्ह होऊन खंड पडलेल्या कालावधीपासून पुढे परीक्षा सुरू होईल.
परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्याला परीक्षेसंदर्भातील माहिती एसएमएस व ई-मेलद्वारे अवगत केली जाणार आहे. मात्र, त्यासाठी विद्यार्थ्याचा नोंदणीकृत ई-मेल आयडी व मोबाइल क्रमांक कार्यान्वित असणे आवश्यक आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना शासन निर्णयनुसार परीक्षेसाठी २० मिनिटांचा कालावधी अधिक दिला जाणार आहे. विद्यापीठाने यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार अभियांत्रिकी २०१५ पॅटर्न च्या प्रथम वर्षाच्या प्रथम सत्रातील अनुशेष (बॅकलॉग) विद्यार्थ्यांच्या परीक्षा १०० टक्के अभ्यासक्रमावर असतील. गणित व संख्याशास्त्र अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन प्रॉक्टर पद्धतीने बहुपर्यायी पद्धतीने ५० गुणांकरिता ३० प्रश्न प्रत्येक २ गुणांसाठी या पद्धतीने विचारण्यात येतील विद्यार्थ्यांनी दिलेली २५ प्रश्नांची अचूक उत्तरे ग्राह्य धरण्यात येतील, असे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
---
परीक्षेसाठी केवळ ‘याच’ संकेतस्थळाचा वापर करावा
परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने ऑनलाईन परीक्षा पूर्ण केल्याची पोहोच दिसेल अशा पद्धतीने स्क्रीन शॉट, फोटो, प्रिंट जतन करून ठेवावे. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी केवळ sppuexam.in या संकेतस्थळाचा वापर करावा. याच संकेतस्थळावर परीक्षेसंदर्भातील आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच परीक्षेचे दरम्यान काही अडचण आल्यास ०२०-७१५३०२०२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे विद्यापीठाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.