पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसपुणे शहरचे पॅनकार्ड नसल्याने, शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचे ॲग्रिमेंट हे प्रशांत सुदामराव जगताप नावे आहे. शहराध्यक्ष म्हणून ते मी माझ्या नावे केले आहे. त्यामुळे उद्या या कार्यालयाचा अन्य गटाकडून ताबा घेण्याचा प्रयत्न झाला तर, त्या विरोधात मला पोलीस तक्रार दाखल करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचा ताबा कोणीच घेऊ शकत नाही. दरम्यान कार्यालयातील फलकावरील अजित पवार यांचा फोटो हटविण्यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जे आदेश देतील त्यानुसार कार्यवाही केली जाईल असेही जगताप यांनी सांगितले.
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक मंगळवारी दुपारी संपन्न झाली. त्यानंतर जगताप पत्रकारांशी बोलत होते. शरद पवार यांना एकमुखी पाठिंबा देण्याचा ठराव आजच्या बैठकीत करण्यात आला असून, मुंबई येथील बुधवारी होणाऱ्या बैठकीला तीनशे ते साडेतीनशे कार्यकर्ते जाणार आहेत. यामध्ये ज्येष्ठ व नवीन पदाधिकारीही राहणार आहेत. ही लढाई कायदेशीर कायदेशीर पातळीवर जाण्याची चिन्हे आहेत, त्यामुळे आज उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून, आम्ही सर्व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहोत असे प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आले आहे.
शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांबरोबरच माजी नगरसेवक व आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे यांना निमंत्रण देण्यात आले होते, मात्र ते का आले नाहीत हे माहीत नाही. मात्र उद्याच्या शरद पवारांच्या बैठकीला शहरातील आमदार उपस्थित राहणार आहेत. दरम्यान जगताप यांनी आजच्या बैठकीला मावळत्या पुणे महापालिका सभागृहातील ४४ पैकी २३ नगरसेवक उपस्थित होते असा दावा यावेळी केला.