माळेगाव येथील रुग्णाच्या संपर्कातील १२ जणांचे अहवाल निगेटिव्ह; बारामतीकरांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 04:27 PM2020-05-14T16:27:00+5:302020-05-14T16:27:19+5:30
शहरात आजपर्यंत एकुण दहा कोरोना रुग्ण सापडले आहेत.
बारामती : बारामती तालुक्यातील माळेगाव बु येथील दहाव्या रुग्णाच्या संपकार्तील १२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली . गुरुवारी(दि. १४)सायंकाळी मिळालेल्या अहवालानुसार रुग्णाच्या कुटुंबातील तिघांजणासह १२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत . मंगळवारी (दि. १२) तालुक्याच्या ग्रामीण भागात तिसरा कोरोनाचा संसर्ग झालेला रुग्ण सापडला आहे. तालुक्यातील माळेगाव येथे सापडलेला दुसरा रुग्ण आहे. ग्रामीण भागातील तिसरा तर, बारामती परिसरातील हा दहावा रुग्ण आहे. शहरात श्रीरामनगर,समर्थनगर म्हाडा वसाहत परिसरसह तालुक्यात माळेगाव,कटफळ येथे आजपर्यंत एकुण दहा सापडले आहेत.त्यापैकी भाजीविकेता असणाऱ्या रुग्णासह माळेगाव येथील रुग्णाचा यापुर्वी मृत्यु झाला आहे. तसेच बारामतीचे एकाच कुटुंबातील सहा रुग्ण कोरोनामुक्तझाले आहेत. आठव्या रुग्णाला ३० एप्रिल रोजी ' डिस्चार्ज ' देण्यात आला आहे. नवव्या कटफळ येथील रुग्णावर मुंबई येथे उपचार सुरु असतानाच माळेगाव बु. येथील कुटुंबाला भेटण्यासाठी आलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. ती व्यक्ती व्यवसायाने वायरमन असून पुणे येथे महावितरणमध्ये नोकरीस आहे. दिनांक ८ मे रोजी माळेगाव बुद्रुक येथे आपल्या राहत्या घरी ते आले होते. त्यांचा पुणे शहरातील एक सहकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने बारामतीत सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात हाय रिस्क कॉन्टॅक्ट तपासणीमध्ये त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
प्रशासनाने त्या रुग्णाच्या कुटुंंबातील तिघांसह एकुण १२ जणांचे कोरोना तपासणीसाठी स्वॅब घेतले होते.त्यापैकी त्या रुग्णाची पत्नी,दोन मुलांचा देखील समावेश होता .माळेगांव येथील दहाव्या रुग्णावर बारामती येथे उपचार सुरु आहेत.त्या रुग्णाच्या संपकार्तील १२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने बारामती तालुक्याची ऑरेंज झोनच्या दिशेने वाटचाल सुखद होणार आहे.