पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने येत्या ४ सप्टेंबरला संयुक्त पूर्वपरीक्षा जाहीर केली आहे. मात्र, धनगर समाजाला साडेतीन टक्के ठरल्याप्रमाणे जागा दिल्या नाहीत. त्यामुळे ठरल्याप्रमाणे आधी जागा जाहीर करा. मगच एमपीएससीची पूर्वपरीक्षा घ्या, अन्यथा परीक्षा रद्द करा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे धनगर समाजातील विविध संघटनांनी केली आहे.
वास्तविक एन.टी. ‘क’ वर्गासाठी ३.५ टक्के आरक्षणाप्रमाणे २३ जागा जाहीर करायला हव्या होत्या. मात्र, त्यामध्ये केवळ २ जागा दिल्या आहेत. एन.टी. ‘क’ वर्गावर हा अन्याय आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार, दत्तात्रय भरणे व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांना यशवंत सेना, धनगर समाज सेवा संघ, पुण्यश्लोक फाऊंडेशन आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी दिले आहे.
लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या वर्ग-२ च्या पदाकरिता ४ सप्टेंबरला परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी प्रथम २८ फेब्रुवारी २०२० ला जाहिरात आली. त्या जाहिरातीमध्ये ६५० जागा पोलीस उपनिरीक्षक पदासाठी मंजूर आहेत. या ६५० जागांत एन.टी. ‘क’ वर्गासाठी फक्त २ जागा दर्शवल्या आहेत. वास्तविक पाहता एन.टी. ‘क’ वर्गासाठी ३.५ टक्के आरक्षणाप्रमाणे २३ जागा जाहीर करायला हव्या होत्या. मात्र, त्यामध्ये या जागा दिसत नाहीत. एन.टी. ‘क’ वर्गावर हा अन्याय आहे.
याबाबत विद्यार्थी आणि समाजामध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून संघटनेने आंदोलने केली आहेत. त्या आंदोलनानंतर पद यादी दुरुस्तीची सामाजिक न्याय मंत्री यांनी ग्वाही दिली होती. मात्र १४ जुलै २०२१ रोजीच्या सुधारित जाहिरातीमध्ये एन.टी. ‘क’ वर्गाच्या पदांमध्ये कोणताही बदल केला नाही.
पुण्यश्लोक फाऊंडेशनचे अध्यक्ष धनंजय तानले, यशवंत सेना महिला आघाडीच्या पद्मावती दूधभाते, धनगर समाज सेवा संघाचे बालाजी अर्जुने, सामाजिक कार्यकर्ते अशोक माने, यशवंत सेनेचे संतोष शिंदे, व्यंकटराव नाईक, बंडू माने, लॉरेन्स गॅब्रियल उपस्थित होते.