पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (A) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल पुण्यातील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंबेडकर उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पुणे रिपब्लिकन पक्षाचे शहर अध्यक्ष अशोक कांबळे, पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, प्रदेश युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष आयुब शेख, नगरसेविका सुनीता वाडेकर,आदी पदाधिकारी उपस्थित होते. अशोक कांबळे म्हणाले, "आमचे नेते रामदास आठवले यांची मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला आहे. समाजाच्या हितासाठी आठवले साहेबांनी काम केले आहे. पक्षाच्या वतीने त्यांचे खूप अभिनंदन करतो. आम्हा कार्यकर्त्यांची फौज नेहमी तुमच्या पाठीशी आहे."बाळासाहेब जानराव म्हणाले, "संविधानाचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी आठवले साहेब कायम सजग असतात. समाजात मिसळणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. गेल्या पाच वर्षात चांगले काम केले आहे. पुढील काळात ते समाजाच्या हिताचे अनेक चांगले निर्णय घेतील, असा विश्वास वाटतो."परशुराम वाडेकर म्हणाले "रामदास आठवले हे रिपब्लिकन पक्षाचे पाहिले असे नेते आहेत, ज्यांना पुन्हा मंत्रिपद मिळाले आहे. त्याचा आम्हा सगळ्यांना अभिमान आहे. रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी नेहमी नरेंद्र मोदी आणि आठवलेंना पाठिंबा देतील. आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची इच्छा होती की, रामदास आठवलेंना कॅबिनेट मंत्रीपद मिळावे. आता साहेबांना चांगले खाते मिळावे, अशी अपेक्षा आहे."'रामदास आठवले तुम्ह आगे बढो' , 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, रिपब्लिकन पार्टीचा विजय असो', 'छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
'रामदास आठवले तुम्ह आगे बढो' म्हणत रिपब्लिकनच्या कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 8:55 PM