पिंपरी : विधानसभेच्या पिंपरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार आणि शरद पवार गटातच मुख्य लढत आहे. मतदारसंघ राखीव असून, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. प्रचार शिगेला पोहोचला असून दोन्ही गटांकडून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी धडपड सुरू आहे.
मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर पिंपरी-चिंचवड शहरात चिंचवड, भोसरी आणि पिंपरी या तीन मतदारसंघांची निर्मिती झाली. यात पिंपरी मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत अण्णा बनसोडे पिंपरीचे पहिले आमदार झाले. त्यानंतर २०१४ मध्ये शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार यांनी विजय मिळवला. २०१९ मध्ये बनसोडे पुन्हा विजयी झाले. दरम्यान, राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. आता राष्ट्रवादीचे अजित पवार आणि शरद पवार गट निवडणूक रिंगणात आमनेसामने आहेत. महायुतीकडून अजित पवार गट तर महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचा उमेदवार लढत आहे. अजित पवार गटाकडून आमदार अण्णा बनसोडे, तर शरद पवार गटाकडून सुलक्षणा शीलवंत निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.
एबी फाॅर्मचा मुद्दा चर्चेत विधानसभेच्या २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादीतर्फे सुलक्षणा शीलवंत यांना उमेदवारी जाहीर करून एबी फाॅर्म दिला होता. त्यानंतर अचानक अण्णा बनसोडे यांना एबी फाॅर्म देण्यात येऊन त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळच्या एबी फाॅर्मच्या नाट्याची चर्चा यंदाच्या निवडणुकीत रंगत आहे. अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून ही चर्चा सुरू झाली आहे.
तळागाळातील कार्यकर्त्याची भूमिका महत्त्वाची
पिंपरी मतदारसंघात दोन वेळा राष्ट्रवादी तर एक वेळा शिवसेनेचा आमदार निवडून आला आहे. राष्ट्रवादीचे प्राबल्य असले तरी शिवसेना आणि रिपाइंचाही मतदार मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये फूट पडली आहे. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर चौथ्यांदा होत असलेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून आहेत. यात शिवसेना, रिपाइं आणि राष्ट्रवादीच्या तळागाळातील कार्यकर्त्याची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
झोपडपट्टीतील मतदार निर्णायक
पिंपरी मतदारसंघात पावणेचार लाख मतदार असून, झोपडपट्ट्यांमध्ये एक लाखावर मतदार आहेत. त्यामुळे हा मतदार निर्णायक ठरणार आहे. त्यांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाणे जिकिरीचे ठरते. झोपडपट्टीतील मतदारांच्या समस्या, झोपडपट्टी पुनर्वसन, पाणीप्रश्न, वीज समस्या, आरोग्य सुविधा असे विविध मुद्दे महाविकास आघाडीकडून प्रचारातून उपस्थित केले जात आहेत. विविध विकासकामे केल्याचे महायुतीकडून सांगण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीत काय झाले?
लोकसभेच्या मावळ मतदारसंघात पिंपरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे संजोग वाघेरे आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यात सरळ लढत झाली. यात पिंपरी मतदारसंघ संजोग वाघेरे यांच्यासाठी ‘होमग्राऊंड’ असतानाही येथून बारणे यांना १६ हजार ७३१ मताधिक्य मिळाले.
पिंपरी मतदारसंघातील मतदार
महिला - १८५३५६पुरुष - २०२४७८तृतीयपंथी - ३४एकूण मतदार - ३८७८६८