आळेफाटा (पुणे) : कत्तल करण्यासाठी गोवंशाच्या जनावरांना बांधून ठेवणाऱ्या तिघांना पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन त्यांच्याकडील १२० जनावरांची कत्तल होण्यापासून मुक्तता केली. ही कारवाई गुरुवारी (दि.११) पहाटेच्या सुमारास जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावात करण्यात आली.
याप्रकरणी अल्ताब हमीद व्यापारी (वय-४८, रा. मुक्ताबाई चौक,बेल्हे,ता.जुन्नर,जिल्हा पूणे), हसिफ शरीफ व्यापारी (वय-३६, रा. पेठआळी, बेल्हे, जिल्हा पुणे), कल्पेश रौफ कुरेशी (वय-१९), रा. पेठआळी, बेल्हे जिल्हा पुणे) या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत आळेफाटा पोलिसांच्या ताब्यात दिले.
बेल्हे येथे जनावरांना चारा पाण्याची व्यवस्था न करता कत्तल करण्याच्या उद्देशाने निर्दयतेने दोरखंडाने बांधून ठेवलेले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई अभिजित सावंत, सहा. पो. फौ. प्रकाश वाघमारे, तुषार पंधारे, पो. हवा. दिपक साबळे, विक्रम तापकीर, जनार्धन शेळके, योगेश नागरगोजे, मंगेश थिगळे, पो. ना. संदीप वारे, अक्षय नवले, दगडू वीरकर यांनी छापा टाकला. त्यांना अवैद्यरित्या ११६ वासरे व ४ गायी असे एकूण १२० जनावरे मिळून आली. पोलिसांनी वरील तिघांना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातील जनावरांची सुटका केली. तिघांना आळेफाटा पोलिसांच्या ताब्यात दिले. अधिक तपास आळेफाटा पो.स्टे.चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
आळेफाटा पोलिसांच्या नाकावर टिच्चून कत्तलखाने सुरूच-
आळेफाटा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत आळे आणि बेल्हे परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात बेकादेशीर कत्तलखाने सुरू आहेत. आळेफाटा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत बेकायदेशीर कत्तलखाने बंद असल्याचा दावा कायमच आळेफाटा पोलीस करतात. मात्र बेल्हे येथे पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १२० जनावरांची सुटका केलेल्या कारवाईने बेल्हे परिसरात बेकायदेशीर कत्तलखाने सुरू असल्याचे सिद्ध झाले आहे.