लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यात अनेक जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य शासनानुसार तसेच स्थानिक प्रशासनाच्या मागणीनुसार आम्ही पथके पाठवले आहेत. सध्या ठाणे, मुंबई, रायगड, सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास २६ पथकांद्वारे बचाव कार्य सुरू आहे. पाण्यामुळे बचावकार्यात अडथळे येत असले तरी आमची पथके प्रत्येक ठिकाणी पोहचली आहे, अशी माहिती एनडीआरएफच्या ५ व्या बटालीयनचे कमांडन्ट अनुपम श्रीवास्तव यांनी लोकमतला दिली.
राज्यात गेल्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. यामुळे मुंबई, ठाण्यासह कोकणातील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती झाली आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, राजगड जिल्ह्यात परिस्थिती बिटक झाली आहे. राज्यशासनाच्या आदेशानुसार आम्ही आमची पथके ही रवाना केली आहे. काही पथके ही घटनास्थळी पोहचली असून त्यांनी बचाव कार्य सुरू केले आहे. महाडमध्ये रस्त्यावर पडलेली झाडी तसेच वाढलेल्या पाण्याच्या पातळीमुळे थोड्या अडचणी आल्या. मात्र, बोटीच्या साह्याने पथक पोहचले आहे. बचावकार्य वाढवण्यासाठी भुवनेश्वरून आणखी पथके मागवण्यात आली आहे. यातील चार पथके विमानाने पुण्यात उतरली आहे. तर दोन पथके गोव्याला आणि दोन पथके रत्नागिरिला पोहचली आहे. ती रवाना झाली असून त्यांना नेमुन दिलेल्या ठिकाणी काही वेळात ती पोहचणार आहे. सध्या पालघर येथे १, ठाणे येथे २, रायगड येथे १, महाड येथे ४, कोल्हापुर येथे २, मुंबई येथे ४ पथके तैनात करण्यात आली आहे, असे श्रीवास्तव यांनी सांगितले.