पुणे : कात्रज ते सिंहगड अशी ट्रेक करत असताना वाटेत पाणी व अन्न संपल्याने चार तरुणांच्या शरीरातील पाणी कमी झाल्याने पाच तास सिंहगडच्या डाेंगराळ भागात अडकून पडले हाेते. टेलस संस्थेच्या लाेकेश बापट व विश्वास घावटे यांच्या पुढाकाराने सिंहगड वनविभाग अाणि वनसंरक्षक समितीच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने या चार तरुणांची सुखरुप सुटका करण्यात अाली.
टेलस संस्थेच्या प्लास्टिक मुक्त सिंहगड उपक्रम दरम्यान संस्थेच्या एका सदस्याने त्याचे काही मित्र ट्रेक करताना एक डोंगराळ भागात अडकले असून त्यांची परिस्थिती पाण्याअभावी गंभीर आहे अशी माहिती लोकेश बापट व विश्वास घावटे यांना दिली. रेंज नसल्यामुळे अडकलेल्या तरुणांशी संभाषणास अडचणी येत हाेत्या. पाण्याविना सिंहगडाच्या अाधी 4 डाेंगराळ भागात हे तरुण झाेपून असल्याचे कळाले. परिस्थीतीचे गांभिर्य अाेळखून लाेकेश बापट अाणि विश्वास घाटे यांनी सिंहगड वन विभाग समितीचे नितीन गाेळे यांनी घटनेची माहिती दिली. गाेळे यांनी वाॅकी टाॅकीवरुन संवाद साधत अधिक कुमक मागवून घेतली. वनसमितीच्या 8 ते 9 कर्मचाऱ्यांनी या तरुणांना भर उन्हात शाेधून काढत त्यांची सुटका केली. तसेच त्यांना शहरात पाठविण्याची व्यवस्था केली. त्यांच्या या जलद हलचालींमुळे पुढील अनर्थ टळला.
टेलस संस्थेतर्फे विजय मुजुमले, भानुदास जोरकर,निलेश पायगुडे,अमित दारांडे, संतोष पदेर, धनराज सांबरे, कैलास झारंडे, कविराज तांबे, निलेश सांगळे, हेमंत गोळे , संतोष खामकर राहुल मुजुमले या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.