- विश्वास मोरे पिंपरी : मतदानाचा हक्क बजावणे हे प्रत्येक नागरिकाचे प्रथम आणि राष्ट्रीय कर्तव्य आहे. मतदान केल्याची खूण म्हणून मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर (बोटावर) शाई लावण्यात येते. अशा शाईच्या ३ लाख बाटल्या महाराष्ट्रात आणण्यात आल्या आहेत. त्यातील ६३६४ बाटल्या मावळ लोकसभा मतदारसंघासाठी पाठविण्यात आल्या आहेत. येथील २२ लाख २७ हजार ७३३ मतदारांच्या बोटावर शाई लावण्यात येणार असून, अशा एकूण ६३.६ लिटर शाईचा वापर करण्यात येणार आहे.मावळ लोकसभेसाठी २९ एप्रिलला मतदान होणार आहे. मतदानाची तारीख जवळ येत आहे, तसतसे जिल्हा प्रशासनाचा निवडणूक विभाग वेगवान होत आहे. निवडणुकीसाठी आवश्यक असणारे बहुतांश साहित्य प्रशासनाला प्राप्त झाले आहे. या असंख्य साहित्यापैकी महत्त्वाची म्हणजे शाई होय. मतदान केल्यानंतर मतदाराच्या बोटावर निळी शाई लावण्यात येते. मावळमध्ये २२ लाख २७ हजार ७३३ मतदार आहेत. तसेच २५०४ मतदान केंद्र आहेत. पनवेलमध्ये ५८४, कर्जतमध्ये ३४३, उरणमध्ये ३३९, मावळमध्ये ३६९, चिंचवडमध्ये ४७०, पिंपरीत ३९९ बूथ आहेत. प्रत्येक बूथवर दोन शाईच्या बाटल्या ठेवण्यात येणार आहेत. मतदारांच्या संख्येनुसारही शाईच्या बाटल्या किती लागतात हे अपेक्षित असते. एका बाटलीमध्ये १० मिली लिटर निळी शाई असते. या एका बाटलीमधून किमान ३५० मतदारांना निळ्या शाईचे निशाण लावण्यात येईल. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, २००४ च्या निवडणुकीवेळी मतदान करणाऱ्या मतदाराच्या बोटावर केवळ एक ठिपका निळ्या शाईचा लावण्यात येत होता. मात्र, २००६ मध्ये निवडणूक आयोगाने ठिपक्याऐवजी सरळ रेषा आखण्याचे निर्देश दिले. त्यामुळे शाई जास्त लागत आहे.एकूण निवडणूक काळात मतदानासाठी लागणाऱ्या शाईची व्यवस्था प्रशासनाकडून केली जाते. जिल्हा प्रशासन निवडणूक आयोगाशी समन्वय करून याबाबतचा निर्णय घेत असते. मात्र, निवडणूक प्रक्रियेत शाईला यामुळे महत्त्व आजही आहे.........कोणत्या बोटावर लागते शाई मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविल्यानंतर त्याला प्रवेश दिला जातो. प्रत्यक्ष मतदानापूर्वीच मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावली जाते. त्यानंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो. जर तर्जनीवर शाई लागलेली असेल तर त्या मतदाराला मतदान करू दिले जात नाही.......म्हैसूरची शाईसंपूर्ण देशात मतदानाच्या वेळी म्हैसूरची शाई वापरण्यात येते. येथील एका वॉर्निश कंपनीमध्ये ती तयार होते. या कंपनीपासून जगातील २५ देशांना निवडणूक शाईचा पुरवठा केला जातो. ही शाई तर्जनीवर लावल्यानंतर अजिबात पुसता येत नाही, अशी ख्याती या शाईची आहे. ......३५० मतदारांच्या तर्जनीवर या एका बाटलीमधून निळ्या शाईचे निशाण लावण्यात येईल.
१९६२ च्या लोकसभा निवडणुकीत देशात सर्वप्रथम शाईचा वापर करण्यात आला होता.