पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये गेल्या ४ वर्षांत प्राध्यापकांनी सादर केलेल्या संशोधन प्रकल्प अहवालात (रिसर्च प्रोजेक्ट रिपोर्ट) मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी विद्यापीठ प्रशासनाकडून ४०० प्राध्यापकांना नोटिसा बजावून खुलासा मागविण्यात आला आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) प्राध्यापकांनी संशोधनासाठी रिसर्च प्रोजेक्ट स्किम राबविण्यात आली. त्यासाठी यूजीसीकडून प्राध्यापकांना संशोधनासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी वितरीत केला गेला. प्राध्यापकांनी दिलेल्या प्रस्तावानुसार त्यांना निधी मंजूर करण्यात आला. मात्र योजनेअंतर्गत संशोधन करून विद्यापीठाला सादर केलेल्या संशोधन प्रकल्प अहवालामध्ये मोठ्या प्रमाणात इतर संशोधकांच्या संशोधनातील कॉपी पेस्ट केली असल्याचे आढळून आले आहे. प्राध्यापकांनी गेल्या ४ वर्षांत यूजीसीचा निधी घेऊन शेकडो संशोधन अहवाल सादर केले. या संशोधन अहवालांची छाननी केली असता या गंभीर बाबी उजेडात आल्या आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे संशोधनातील चोरी शोधण्यासाठी सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. या सॉफ्टवेअरद्वारे त्याचा उलगडा झाला आहे. त्यामुळे ४०० प्राध्यापकांना नोटिसा बजावून त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला आहे.
प्राध्यापकांकडे विद्यार्थी पीएच.डी., एम.फिलचे संशोधन करत असतात. या विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनातील तथ्यांची प्राध्यापकांनी चोरी केली असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर काही प्राध्यापकांकडून इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या संशोधनाची कॉपी पेस्ट केली असल्याचे आढळून आले. विद्यापीठ प्रशासनाकडून अंतर्गत गुणवत्ता तपासणीअंतर्गत संशोधन प्रकल्प अहवालांची छाननी करीत असताना या बाबी उजेडात आल्या आहेत. विद्यापीठांमध्ये होणाऱ्या पीएच.डी., एम.फिल.च्या संशोधनाच्या दर्जांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आता प्राध्यापकांच्या संशोधन प्रकल्पांमध्येही हेराफेरी झाली असल्याचे आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यूजीसीकडून लाखो रुपयांचा निधी घेऊनही निकृष्ट दर्जाचे संशोधन करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.प्राध्यापकांच्या संशोधन प्रकल्पामध्ये काही त्रुटी आढळून आल्याने त्याबाबत त्यांच्याकडे विचारणा करण्यात आली आहे. संशोधन प्रकल्प विद्यापीठाला सादर केल्यानंतर त्याची पुस्तके प्रकाशित केली जातात. त्यातूनही या तांत्रिक त्रुटी निघाल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्राध्यापकांचे खुलासे प्राप्त झाल्यानंतर त्याची छाननी केली जाईल. त्यानंतरच संशोधनामध्ये चोरी झाली की नाही हे स्पष्ट होऊ शकेल.- डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ